युक्रेनच्या सैन्याने रशियाला मोठा झटका देत रशियाची अत्याधुनिक मिसाईल डिफेन्स यंत्रणा उद्ध्वस्त केली. अगदी रशियानेही आपले मोठे नुकसान झाल्याचे मान्य केलेय. युक्रेनच्या सैन्याला अमेरिकेने हे खास मिसाईल पुरवले होते. या मिसाईलने कमाल करून दाखवल्याचा दावा युक्रेनने केला.
सोमवारी रशियाच्या कुर्स्क भागात युक्रेनने केलेल्या हल्ल्यात रशियाची हवाई संरक्षण यंत्रणा आणि एका हवाई तळाचे नुकसान झाले. रशियानेच निवेदन देऊन ही माहिती दिली. रशियाने या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर करण्याचा इशारा दिलाय.
रशियाला आपल्या एस- 400 मिसाईल डिफेन्स यंत्रणेवर अधिक विश्वास होता. मात्र अमेरिकेच्या मिसाईल माऱयापुढे हा विश्वास फोल ठरल्याचे दिसत आहे. युक्रेनने कुर्स्क प्रांतातील लोटारेवका भागातील ‘एस- 400 मिसाईल डिफेन्स सिस्टिम’ उद्ध्वस्त केली. या हल्ल्याने हादरलेला रशिया आता उत्तर कोरियाची फौज तैनात करणार आहे. याआधीच रशियाने पहिल्यांदा ओरेश्निक मिसाईलचा वापर करून साऱया जगाला धक्का दिलेला आहे. युक्रेन वायुदलाच्या म्हणण्यानुसार, रशियाने केवळ ड्रोनच नव्हे, तर चार बॅलेस्टिक मिसाईलही सोडले होते. रशियाने सोडलेल्या ड्रोनपैकी 76 ड्रोन पाडण्यात आल्याचा दावा युक्रेनने केला.
युक्रेनवर 188 लढाऊ ड्रोनचा मारा
रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने पाच पैकी तीन अमेरिकन मिसाईल पाडले. मात्र दोन मिसाईल हवाईतळावर धडकण्यात यशस्वी झाले. त्यामुळे यंत्रणेच्या रडारचे मोठे नुकसान झाले. या हल्ल्याला तोंड देताना रशियाने रात्रभर युक्रेनवर 188 लढाऊ ड्रोन सोडले. युद्धातील हा मोठा ड्रोन हल्ला असल्याचे बोलले जातेय.