धनुष आणि ऐश्वर्या रजनीकांतचा घटस्फोट, लग्नाच्या 20 वर्षांनंतर मोडला संसार

दाक्षिणात्य अभिनेता धनुष आणि ऐश्वर्या रजनीकांत यांचा घटस्फोट झाल्याची बातमी समोर आली आहे. लग्नाच्या 20 वर्षानंतर हे जोडपे घटस्फोटाद्वारे वेगळे झाले आहेत. दोन वर्षांपूर्वी विभक्त होण्याची घोषणा केल्यानंतर धनुष आणि ऐश्वर्याच्या घटस्फोटाला न्यायालयाने मान्यता दिली आहे. सन टीव्ही आणि न्यूज 18 ने दिलेल्या वृत्तानुसार, चेन्नई कुटुंब कल्याण न्यायालयाने या जोडप्याला घटस्फोट मंजूर केला आहे. त्यांना एकत्र राहायचे नसल्याने, न्यायालयाने घटस्फोट मान्य केल्याचं सांगण्यात येत आहे.

धनुष आणि ऐश्वर्या रजनीकांत यांच्या घटस्फोट प्रकरणावर यापूर्वी तीनदा सुनावणी झाली होती. मात्र तिन्ही वेळा हे जोडपं सुनावणीला गैरहजर होतं. मात्र मागच्या सुनावणीत ऐश्वर्या न्यायालयात हजर झाली होती. त्यानंतर न्यायाधीशांनी 27 नोव्हेंबर रोजी सुनावणी निश्चित केली होती. यानंतर आज न्यायालयाने त्यांच्या घटस्फोटाला मान्यता दिली.

दरम्यान, याआधी धनुष अभिनेत्री नयनतारासोबतच्या वादामुळे चर्चेत होता. धनुषने आरोप केला आहे की, नयनताराच्या लग्नाच्या डॉक्युमेटरीमध्ये त्याच्या 2015 मधील तमिळ चित्रपट ‘ननुम राउडी धान’चे फुटेज वापरले गेले आहेत. यासाठी परवानगी देण्यात आली नव्हती. चित्रपटाची तीन सेकंदाची बीटीएस क्लिप वापरल्याबद्दल धनुषने नयनताराकडून 10 कोटी रुपयांची भरपाई मागितली होती.