सामना अग्रलेख – संविधान दिनाचे ढोंग!

मोदी यांना संसदेत विधानसभेत विरोधी पक्षच नको आहे. मुळात त्यांना लोकशाही नकोय संविधानाचे राज्य नकोय. त्यांनाफोडा, झोडा, राज्य करा देश लुटणाऱ्यांना पाठबळ द्याहेच धोरण राबवायचे आहे. संविधानाचे रक्षण करावे देश संविधानाचा सन्मान करून चालवावा असे मोदीशहांना वाटत नाही. विरोधी पक्षांच्या ताब्यात असलेल्या राज्यांना मोदी कस्पटासमान लेखतात. ही काय संविधानाची शिकवण आहे? समता, समान न्यायाचे तत्त्व येथे उद्ध्वस्त झाले आहे. लोकशाहीचे चारही स्तंभ गुलाम करून कोणी संविधान उत्सवाचा डंका वाजवत असेल तर ते ढोंग आहे. मोदी, संविधान वाचा मग बोला!

 मोदी सरकारने संविधान दिवस साजरा केला हे एक आश्चर्यच म्हणावे लागेल. मोदी व त्यांचे लोक देशात गांधींना मानत नाहीत. त्यांचे लोक इथे गांधींचा खून करणाऱ्यांचे पुतळे उभे करतात, पण मोदी विदेश दौऱ्यावर जातात तेव्हा त्या देशातील गांधी स्मारकांवर जाऊन माथे टेकतात. त्यामुळे मोदी सरकारने संविधान दिवस साजरा केला हे आश्चर्य वाटणारे असले तरी धक्कादायक नाही. ‘बटेंगे तो कटेंगे’ वगैरे घोषणा देऊन निवडणुका लढणाऱ्यांचा संविधानाशी संबंध काय? संविधान दिनाचा सरकारी कार्यक्रम संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात पार पडला. त्याच वेळी काँग्रेसने संविधान दिनाचा त्यांचा स्वतंत्र कार्यक्रम दिल्लीत साजरा केला. ‘‘मोदी यांनी देशाचे संविधान वाचले नाही!’’ असा टोला राहुल गांधी यांनी मारला. देशाची सध्याची स्थिती पाहता राहुल गांधी खरेच बोलले याविषयी शंका वाटत नाही. मोदी सत्तेत आल्यापासून संविधानास अपेक्षित असलेले कायद्याचे राज्य येथे दिसत नाही. न्याय, समता, बंधुत्व, धर्मनिरपेक्षता या संज्ञा पूर्णपणे नष्ट झाल्या आहेत. जाती आणि धर्मांत भांडणे सुरू आहेत व देशाची संपत्ती अदानी या एकाच उद्योगपतीच्या कब्जात गेली आहे. भारताच्या संविधानाला हे अपेक्षित नव्हते. न्यायालये निष्पक्ष राहिलेली नाहीत व घटनात्मक पेचप्रसंगांवर न्याय देण्याऐवजी न्यायाधीश पलायन करतात. निवडणूक आयोग, राजभवन हे मोदींच्या अंधभक्तांचे अड्डे बनले आहेत. देशातील निवडणुका हा एक फार्स बनला आहे. मते व मतदार विकत घेतले जातात किंवा निवडणूक यंत्रणा ताब्यात घेऊन विजय मिळवले जातात. हा आपल्या लोकशाहीचा खेळखंडोबा आहे व तो करणारे संसदेत संविधान दिवस साजरा करतात. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी संविधान दिवशी

एक मागणी केली

ती म्हणजे, ‘‘आम्हाला ईव्हीएमवर निवडणुका नकोत, सर्व निवडणुका बॅलट पेपरवर घ्या.’’ श्री. खरगे यांनी ही मागणी केली त्यास महाराष्ट्राचे विधानसभा निकाल कारणीभूत आहेत. भाजप जिंकला तो गैरमार्गाने हे उघड झाले, पण मोदी त्या पापी विजयाचा उत्सव साजरा करतात. महाराष्ट्रात झालेल्या मतदानापेक्षा साधारण दहा लाखांवर मते जास्त मोजली. हा आकडा आणखी वाढू शकतो. हा घोटाळा आहे, पण मोदी व त्यांच्या लोकांना त्याचे काहीच पडलेले नाही. आमदार, खासदार चोरायचे व निवडणुकीत मतेही चोरायची, असा मोदी सरकारचा खेळ चालला आहे. उत्तर प्रदेशात संभल येथे जामा मशिदीच्या सर्वेक्षणावरून दंगा भडकवला गेला. तेथील पोलीस गोळीबारात आतापर्यंत पाच जण मरण पावले. जामा मशिदीच्या खाली मंदिर आहे, असा काही लोकांचा दावा होता व त्यासाठी मशिदीचे सर्वेक्षण करण्याची परवानगी सुप्रीम कोर्टाने दिली. सरन्यायाधीश चंद्रचूड हे अशी आग लावून गेले व त्याची फळे देश भोगत आहे. मशिदीचे सर्वेक्षण करायला हरकत नाही असा एक निर्णय चंद्रचूड काळात दिल्यापासून भक्त चेकाळले आहेत व हाती कुदळ-फावडी घेऊन सगळय़ाच मशिदींच्या तळघरात खोदकामाला निघाले आहेत. देशाला विघटनाकडे व अराजकाकडे नेणारे हे उद्योग आहेत. संविधानाला हे असले उद्योग मान्य नाहीत, पण मोदी ते करून घेत आहेत व पुन्हा साळसूदपणे संविधान दिवसाचा उत्सव मनवीत आहेत. निवडणुका जिंकण्यासाठी हे दळभद्री प्रकार सुरू आहेत. महाराष्ट्रात आमदार विकत घेऊन भाजपने

संविधानविरोधी सरकार

बसवले. त्यासाठी राज्यपालांनी खोटारडेपणा केला. निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्टाने संविधानाची फसवणूक करून सरकारला संरक्षण दिले. तेव्हा यापैकी कुणालाच संविधानाच्या मूल्यांची फिकीर वाटली नाही. लोकसभा निवडणुकीत त्यांना चारशे जागा जिंकून संविधान बदलून टाकायचे होते, पण आपण भारतीय लोक शहाणे असल्याने मोदींचे हे मनसुबे उधळले गेले, पण म्हणून मोदी व त्यांचे लोक स्वस्थ बसलेत असे नाही. स्वार्थासाठी त्यांची कपट-कारस्थाने चालूच आहेत. कारण मोदी व त्यांच्या लोकांनी भारतीय संविधानाचे एकही पान वाचलेले नाही. त्यामुळेच राहुल गांधी यांनी मोदींना उघडे पाडले आहे. मोदी संसद चालू देत नाहीत. अदानीच्या भ्रष्ट कारभारावर विरोधी पक्षनेते बोलायला उभे राहिले की, त्यांचा माईक बंद पाडला जातो. मोदी यांना संसदेत व विधानसभेत विरोधी पक्षच नको आहे. मुळात त्यांना लोकशाही नकोय व संविधानाचे राज्य नकोय. त्यांना ‘फोडा, झोडा, राज्य करा व देश लुटणाऱ्यांना पाठबळ द्या’ हेच धोरण राबवायचे आहे. मणिपूर जळत आहे. तेथे भररस्त्यावर महिलांना नग्न केले जात आहे. बलात्कार सुरू आहेत. ते पाहून संविधानाच्या प्रती अश्रूंनी भिजल्या असतील, पण संविधानाचे रक्षण करावे व देश संविधानाचा सन्मान करून चालवावा असे मोदी-शहांना वाटत नाही. विरोधी पक्षांच्या ताब्यात असलेल्या राज्यांना मोदी कस्पटासमान लेखतात. ही काय संविधानाची शिकवण आहे? समता, समान न्यायाचे तत्त्व येथे उद्ध्वस्त झाले आहे. हम करे सो कायद्याला संविधानात स्थान नाही. लोकशाहीचे चारही स्तंभ गुलाम करून कोणी संविधान उत्सवाचा डंका वाजवत असेल तर ते ढोंग आहे. मोदी, संविधान वाचा व मग बोला!