टीम इंडियाने जसप्रीत बुमराच्या नेतृत्वाखाली पर्थ कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभवाची धुळ चारत बॉर्डर गावस्कर करंडकाची दणक्यात सुरुवात केली. तोच उत्साह आणि तोच जोश कायम ठेवत टीम इंडिया आता दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी सज्ज झाली आहे. दुसरा कसोटी सामना पिंक बॉलवर (दिवस-रात्र) खेळवला जाणार आहे. त्यामुळे चाहत्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. अशातच टीम इंडियाला मोठा धक्का बसला असून पहिल्या कसोटी सामन्याला मुकलेला शुभमन गिल या कसोटी सामन्यालाही मुकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये दुसरा कसोटी सामना 6 डिसेंबर पासून अॅडलेड येथे (दिवस-रात्र) खेळवला जाणार आहे. या सामन्यातही टीम इंडियाचे पारडे जड मानले जात आहे. पहिल्या कसोटी सामन्यात गोलंदाजांनी निर्विवाद वर्चस्व गाजवले. तसेच यशस्वी जयस्वाल, विराट कोहली यांनी धमाकेदार कामगीरी करत टीम इंडियाच्या विजयात महत्त्वाची भूमिका पार पाडली. मात्र, शुभमन गिलच्या जागी संधी मिळालेल्या देवदत पड्डीकलला लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. सरावा दरम्यान शुभमन गिलच्या बोटाला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे शुभमन गिलच्या जागी देवदत्तला पहिल्या कसोटी सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. अशातच आता दुसऱ्या कसोटी सामन्यालाही शुभमन गिल मुकणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. टाईम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वृत्तवाहीनीने या संदर्भात वृत्त दिले आहे.
शुभमन गिलच्या बोटाला चेंडू लागल्यामुळे दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला डॉक्टरांनी 10 ते 15 दिवस आराम करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळेच पहिला कसोटी सामना तो खेळू शकला नाही. दुसरा कसोटी सामना सुरू होण्यापूर्वी टीम इंडियाचा सराव सामना पार पडणार आहे. या सामन्यामध्ये शुभमन गिल खेळणार नाही. त्याची दुखापत कितपत बरी झाली आहे, याची प्रथम तपासणी करण्यात येईल. तसेच त्याला कसून सराव सुद्धा करावा लागणार आहे. त्यामुळे दुसऱ्या कसोटी सामन्यात शुभमन गिल खेळण्याची शक्यता फार कमी आहे.