जनतेच्या मनातील शंकांचे निवडणूक आयोग उत्तर देईल का? रोहित पवार यांचा सवाल

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. तसेच जनतेच्या मनातही अनेक शंका आहेत. द वायरने मतमोजणीत 5 लाखापेक्षा एधिकची मते कुठून आला, असा प्रश्न एका लेखातून केला होता. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पुरावे सादर करत मतमोजणीतील तफावत आणि साम्य दाखवून दिले होते. आता शरद पवार यांच्या पक्षातील नेते रोहित पवार यांनी ट्विट करत जनतेच्या मनातील शंकांची उत्तरे निवडणूक आयोग देईल का, असा सवाल केला आहे.

याबाबत रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी पोस्टल मतदान आणि ईव्हीएम मतदानातील जनतेचा कौल स्पष्ट केला आहे. तसेच या निकालाबाबत आणि ईव्हीएमबाबत जमतेच्या मनात शंका आहेत, त्याची उत्तरे निवडणूक आयोग देईल का, असा सवाल केला आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, राज्यातील जनतेमध्ये #EVM संदर्भात निर्माण झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर आम्ही आवाज उठवत आहोत.मतदानात अचानक झालेली वाढ, पोस्टल बॅलेट आणि #EVM मधील फरक, फॉर्म 20 अद्याप दिलेले नसणे, असे अनेक प्रश्न आज सामान्य मतदारांच्या मनात आहेत. याचाच भाग म्हणून आम्ही निवडणूक आयोगाचा डेटा नीट अभ्यासला असता काही महत्त्वाच्या नोंदी लक्षात आल्या, ज्यामधून लोकशाहीवर विश्वास असलेल्यांची चिंता वाढल्याशिवाय रहात नाही. आम्हाला लक्षात आलेली आकडेवारी जनतेसमोर ठेवत आहोत. निवडणूक आयोग यावर उत्तर देईल का? की नेहमीप्रमाणे जनभावनेला डावलण्यात येईल ते पाहू. विधानसभा निकालात आता बदल नाही होणार हे मान्य, पण येणाऱ्या निवडणुकांसाठी आमच्या मनातल्या सर्व शंकांचे निरसन होईल, ही अपेक्षा!, असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.

निवडणूक निकालात बदल होणार नाही, हे स्पष्ट असले तरी या घटनांमुळे लोकशाहीवर विश्वास अणाऱ्यांची चिंता वाढत आहे. त्यामुळे जनतेच्या मनातील शंका आणि आमच्यासमोर आलेली आकडेवारी आम्ही मांडत आहोत. त्यामुळे निवडणूक आयोगाने जनतेच्या शंकाची उत्तरे देत संभर्म दूर करावा, असे म्हटले आहे.