‘भारतीय झगडा पार्टी मुळेच संभलमध्ये हिंसाचार’, संजय सिंह यांचं वक्तव्य

उत्तर प्रदेशमधील संभल येथील जामा मशिदीच्या सर्वेक्षणावरून झालेल्या हिंसाचारात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. याच घटनेवर राज्यसभा खासदार आणि आप नेते संजय सिंह यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले आहेत की, या देशात एकपक्षीय राजवट आहे, ज्याचे नाव आहे भारतीय झगडा पार्टी. त्यानं संपूर्ण देशात हिंसाचाराच्या घटना घडून आणायच्या आहेत. संभलमध्ये कारण नसताना पुन्हा सर्वेक्षण करून जिल्हा दंडाधिकाऱ्याने भांडणं लावून देण्याचं काम केलं. यात पाच लोकांना आपला जीव गमवावा लागला.

संजय सिंह म्हणाले, ”ही हिंदू आणि मुस्लिममधील भांडणे नव्हती, उत्तर प्रदेश सरकारद्वारे या पाच लोकांची हत्या करण्यात आली. ही सरकार प्रायोजित हिंसा होती.”

सिंह यांनी उत्तर प्रदेशातील बेरोजगारी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर हल्लाबोल केला. संजय सिंह म्हणाले की, उत्तर प्रदेशातील गरीब आणि बेरोजगार तरुण नोकरीसाठी खस्ता खात आहेत. तर दुसरीकडे अमित शहा यांचा मुलगा असो किंवा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचा मुलगा असो, ते दुबईच्या शेखांसोबत हजारो कोटींचा व्यवसाय करत आहेत.

दरम्यान, संभल हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्या पाच तरुणांचे शवविच्छेदन अहवाल आले आहेत. हे मृत्यू पोलिसांच्या गोळीबारात झालेले नसून जमावाने केलेल्या पिस्तूलच्या गोळ्यांमुळे झाल्याचे सांगण्यात आलं आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.