महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूकीचा निकाल लागून चार दिवस झाले तरी अद्याप मुख्यमंत्रीपदाबाबात कोणताही निर्णय झालेला नाही. भाजप नेहमीप्रमाणे वापरा व फेका या नितीप्रमाणे मिंधेंचा वापर करून त्यांच्याकडून मुख्यमंत्रीपद काढून घेणार असल्याची चर्चा होती.
अखेर बुधुवारी मिंधे गटाचे नेते व राज्याचे काळजीवाहू एकनाथ शिंदे यांनी बुधवारी ठाण्यात पत्रकार परिषद घेत त्यावर शिक्कामोर्तब केले. एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत अत्यंत जड अंत:करणाने भाजपच्या मुख्यमंत्र्याला माझे पूर्ण समर्थन असेल, असे जाहीर केले. मात्र या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा एका शब्दानेही उल्लेख न केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावरून भाजप व मिंधे गटात रस्सीखेच सुरू होती. मिंधे व भाजप मधील नेते आमचाच मुख्यमंत्री होणार यावर ठाम होते. त्यात आता एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत भाजपचा मुख्यमंत्री होणार असल्याचे सांगितले आहे. ”सत्तास्थापनेत माझा अडसर येणार नाही. मोदी – शाह जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल. अमित शहांना मी फोन करून माझ्या भावना सांगितल्या आहेत. ते जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल”, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख टाळला
एकनाथ शिंदे यांनी जवळपास अर्धा तासाची पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत त्यांनी एकदाही देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख केला नाही. त्यामुळे मुख्यमंत्रीपदावरून या दोघांमध्ये विसंवाद असल्याचे दिसून आले.