ED, CBI, SEBI ने राष्ट्रहितासाठी अदानीवरील आरोपांची चौकशी करावी; जयराम रमेश यांची मागणी

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मणिपूरमधील हिंसाचार आणि अदानीचा मुद्दा गाजत आहे. काँग्रेसने या दोन्ही मुद्द्यांवर आक्रमक भूमिका घेतली आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी उद्योगपती गौतम अदानीला अटक करण्याच्या मागणीवर जोर दिला आहे. अमेरिकेत त्यांच्यावर करण्यात आलेले आरोप अदानी फेटाळणार आहेत. त्यामुळे या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी एक्सवर याबाबत पोस्ट केली आहे.

या पोस्टमध्ये जयराम रमेश यांनी म्हटले आहे की, आज सकाळी मोदानी इकोसिस्टमने कायदेशीर बाबी मांडल्या यात आश्चर्य नाही. अदानी यांना आता इतर देशांमध्ये गंभीर कारवाईचा सामना करावा लागत आहे. मोडानी इकोसिस्टम डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न करण्यात येत आहे. या प्रयत्नांमुळे अमेरिकन एजन्सींनी लावलेल्या आरोपांचे गांभीर्य कमी होत नाही. गौतम अदानी, सागर अदानी आणि इतरांनी लाच देत अनेक परवानग्या मिळवल्याचे आरोपपत्रात स्पष्टपणे म्हटले आहे. या वस्तुस्थितीतून सुटका नाही.

अदानी यांच्याकडून सरकारी अधिकाऱ्यांना सुमारे 2,029 कोटी रुपये (अंदाजे $265 दशलक्ष) लाच देऊ केली आणि वचन दिले ज्यामुळे भारतीय सरकारी अधिकाऱ्यांनी राज्य वीज वितरण कंपन्यांना PSA ची अंमलबजावणी करण्यास प्रवृत्त केले. सागर अदानी आणि विनीत जैन यांनी ऊर्जा कंपनीच्या उपकंपनीला 2.3 GW PPAs चे पुनर्वाटप करण्यासाठी SECI प्रक्रियेवर दबाव टाकला. अधिकारानुसार, ईडी, सीबीआय आणि सेबीने या खुलाशांच्या पार्श्वभूमीवर सक्रियपणे तपास केला पाहिजे. भ्रष्ट राजकीय-व्यावसायिक संगनमताची हत्यारे म्हणून काम न करता राष्ट्राप्रती असलेले त्यांचे कर्तव्य पार पाडणे त्यांच्यासाठी आवश्यक आहे, असेही रमेश यांनी म्हटले आहे. आम्ही हे मुद्दे संसदेत आणि लोकांसोबत मांडत राहू. सत्यमेव जयते!, असे त्यांनी पोस्टमध्ये स्पष्ट केले आहे.

काँग्रेसचे खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही गौतम अदानी यांना अटक करण्याच्या मागणीवर जोर दिला आहे. अदानी त्यांच्यावरील आरोप फेटाळणारच आहेत. छोट्या-छोट्या आरोपांवरून शेकडो लोकांना अटक केली जात आहे. अदानी यांच्यावर अमेरिकेत हजारो कोटींचा आरोप आहे. त्यांना अटक करण्यात यावी. त्यांची तुरुंगात रवानगी करण्यात यावी. मात्र, सरकारकडून त्यांचा बचाव करण्यात येत आहे, असे रमेश यांनी बुधवारी संसदेबाहेर पत्रकारांना सांगितले.