मुख्यमंत्रीपदावरून साठमारी! फडणवीस दिल्लीत, शिंदेंची मुंबईत पत्रकार परिषद

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 4 दिवस झालेत. महायुतीला पूर्ण बहुमत असतानाही अद्याप मुख्यमंत्री कोण होणार हे स्पष्ट झालेले नाही. यावरून मिंधे गट आणि भाजपमध्ये जोरदार साठमारी सुरू असल्याचे दिसते.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला 132, मिंधे गटाला 57 आणि अजित पवार गटाला 41 जागा मिळाल्या. महायुतीला पूर्ण बहुमत मिळाले असूनही मुख्यमंत्रीपदावर अद्याप शिक्कामोर्तब झालेला नाही. मिंधे गट आणि भाजपकडून यावर दावा ठोकला जात असतानात बुधवारी दुपारी देवेंद्र फडणवीस अचानक दिल्लीत दाखल झाले, तर दुसरीकडे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुपारी 3 वाजता पत्रकार परिषद बोलावली आहे. त्यामुळे दिल्ली आणि मुंबईतील राजकीय घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आले असता ते म्हणाले की, तिन्ही पक्ष मिळून याचा निर्णय घेतील. आमच्या पक्षश्रेष्ठींशी चर्चा सुरू आहे. लवकरच या प्रश्नाचे उत्तर सर्वांना मिळेल. तसेच आधी मुख्यमंत्री ठरेल आणि त्यानंतर मुख्यमंत्री मंत्री ठरवतील. मुख्यमंत्री फायनल झाले की मंत्र्‍यांची नावे ठरतील, असेही ते म्हणाले.

अजितदादा गटाचा फडणवीसांना पाठिंबा

देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात मुख्यमंत्री पदासाठी चर्चा सुरू असतानाच अजित पवार गटाने फडणवीसांना पाठिंब्याचे पत्र दिले असल्याची चर्चा आहे. त्यामुळे फडणवीसांच्या ‘पुन्हा’ येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

शिंदेंना झटका, अजितदादा गटाचा फडणवीसांना पाठिंबा