Parliament Winter Session 2024 – अदानी लाचखोरी प्रकरणावरून संसदेत गदारोळ, विरोधकांनी सरकारला घेरलं; कामकाज दिवसभरासाठी तहकूब

अमेरिकेतील अदानींचे लाचखोरी प्रकरण, मणिपूर आणि संभलमधील हिंसाचार यासह इतर मुद्द्यांवर विरोधी पक्षांच्या सदस्यांनी आज संसदेत सरकारला घेरले. अदानी, मणिपूर आणि संभलमधील हिंसाचारासह इतर प्रमुख मुद्द्यांवर विरोधी पक्षांनी चर्चेची मागणी केली आहे. काँग्रेसचे के. सी. वेणुगोपाल, मनिकम टागोर यांनी अदानी प्रकरणी स्थगन प्रस्तावाची नोटीस देत चर्चेची मागणी केली. तर काँग्रेसने मणिपूरमधील हिंसाचार आणि आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह यांनी संभलमधील हिंचाराच्या मुद्द्यावर राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात चर्चेची मागणी केली. पण विरोधी पक्षांची चर्चेची मागणी संसदेत फेटाळून लावण्यात आली. यामुळे विरोधी पक्षांच्या सदस्यांनी चर्चेची मागणी करत घोषणा दिल्या. गदारोळानंतर संसदेच्या दोन्ही सभागृहांचे लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

लोकसभेचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्षांच्या सदस्यांनी अदानी प्रकरण उचलून धरले. काही सदस्यांनी पुढे येत जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे दुपारी 12 वाजेपर्यंत लोकसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले. दुपारी वाजता कामकाज सुरू झाल्याव विरोधी पक्षांनी तेच मुद्दे लावून धरेल आणि घोषणा दिल्या. यामुळे लोकसभेचे कामकाज उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं. तर राज्यसभेतही हेच चित्र दिसले. राज्यसभेतही काँग्रेससह विरोधी पक्षांच्या इतर सदस्यांनी अदानी आणि संभलमधील हिंसाचाराच्या घटनेसह इतर मुद्दे उपस्थित केले. राज्यसभेचे कामकाजही उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.

‘अदानी शब्द ऐकताच सरकार, भाजप नेते संसद सोडून पळ काढत आहेत’

संसदेचे कामकाज विरोधी पक्षांनी बाधित केलेले नाही. संसदेचे कामकाज सुरळीत चालावे, ही विरोधी पक्षांची इच्छा आहे. मोदी सरकार चर्चेपासून पाठ दाखवून पळत आहे. अदानी शब्द ऐकताच ते संसद सोडून पळ काढत आहेत. भाजप नेते संसदेतून का पळ काढत आहेत? अदानीवर चर्चा करण्यास त्यांना का वाईट वाटतंय? अदानी भाजपचे सदस्य आहेत? अदानी भाजपचे संरक्षक आहेत? अदानी भाजपचे अध्यक्ष आहेत? भ्रष्टाचार प्रकरणात अदनींवर अमेरिकेत ठपका ठेवण्यात आला आहे. हिंदुस्थानमध्ये भ्रष्टाचार झाल्याचे अमेरिकेत सिद्ध झाले आहे, हजारो कोटींची लाच दिली गेली आणि घेतली गेली. मग त्यावर चर्चा का होऊ नये? त्यावर सरकारने उत्तर द्यावं, दोषीला तुरुंगात का पाठवलं जात नाही? या चर्चेला सरकारचा काय हरकत आहे? ही चर्चा न करणं देशविरोधी आहे. सतत संसदेचं कामकाज तहकूब करत असाल तर ते देशहिताचे नाही. चर्चा न घडवून सरकार देशविरोधी काम करत आहे, असा आरोप काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी केला.

‘इंडिया’ अघाडीतील घटक पक्षांची बैठक

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आहे. संसदेचं कामकाज सुरू होण्यापूर्वी विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ अघाडीतील प्रमुख नेत्यांची बैठक झाली. अदानी समूहावरील आरोप, उत्तर प्रदेशातील संभलमधील हिंसाचार आणि मणिपूमधील हिंसाचाराच्या मुद्द्यांसह इतर मुद्दे संसदेत उपस्थित करण्याचा निर्णय या बैठकीत झाला. काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या संसदेतील कार्यालयात विरोधी पक्ष नेत्यांची ही बैठक झाली. या बैठकीत खरगे यांच्यासह लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी, शिवसेने नेते, खासदार संजय राऊत आणि शिवसेना खासदार अरविंद सावंत यांच्यासह इतर पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते.