दुसऱ्या पत्नीला आई म्हटले नाही म्हणून पोटच्या मुलाची हत्या केल्याप्रकरणी मुंबईतील न्यायालयाने नराधम बापाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सलिम शेख असे आरोपी पित्याचे नाव आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एसडी तावशीकर यांनी सोमवारी सलिमला दोषी ठरवत शिक्षा सुनावली.
दक्षिण मुंबईतील डोंगरी भागात ऑगस्ट 2018 मध्ये ही घटना घडली होती. याप्रकरणी मयत इमरानच्या आईने तक्रार दिल्यानंतर सलिमला अटक करून पुढील कारवाई करण्यात आली. इमरानच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, इमरानने सलिमच्या दुसऱ्या पत्नीला ‘आई’ म्हणून संबोधण्यास नकार दिल्याने पिता-पुत्रामध्ये वाद झाला. नंतर या वादाचे हाणामारीत रुपांतर झाले.
यादरम्यान सलिमने इमरानवर धारदार शस्त्राने हल्ला केला. यात गंभीर जखमी झालेल्या इमरानला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. यानंतर इमरानच्या आईच्या तक्रारीवरून पुढील कारवाई करण्यात आली.
यावेळी बचाव पक्षाच्या वकिलांनी पीडिताने ड्रग्जच्या नशेत स्वतःवर हल्ला करत आत्महत्या केल्याचा दावा केला होता. मात्र न्यायालयाने या युक्तीवादाकडे दुर्लक्ष करत आरोपीने जखमी मुलाला रुग्णालयात नेण्याऐवजी घटनास्थळावरून पळ काढल्याचे नमूद केले.
हे दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरण असल्याचे सांगत फिर्यादी पक्षाने आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. तथापि, स्वतःच्या मुलाच्या हत्येला कारणीभूत ठरल्याचे हे दुर्मिळ प्रकरण असल्याचे म्हणणे जरी योग्य असले तरी हे उदाहरण “दुर्मिळातील दुर्मिळ” श्रेणीत बसत नाही, असे न्यायालयाने नमूद केले. एकूण परिस्थिती लक्षात घेता जन्मठेपेची शिक्षा देणे योग्य असेल, असे न्यायाधीश म्हणाले.