भोवळ येऊन कोसळलेल्या तरुणीला उचलून पोलीस धावत रुग्णालयात पोहोचला

कर्जत रेल्वे स्थानक परिसरात अचानक भोवळ येऊन कोसळल्याने बेशुद्ध पडलेल्या 21 वर्षीय तरुणीचे प्राण तेथे ड्युटीवर असलेल्या रेल्वे पोलिसामुळे वाचले. अंकिता दाभोळकर असे या तरुणीचे नाव आहे. ती कोसळून बेशुद्ध पडताच पोलिसाने तिला उचलले आणि धावत कर्जतच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. वेळेवर उपचार मिळाल्याने अंकिताचे प्राण वाचले आणि ती शुद्धीवर आली. या कर्तव्य तत्परतेमुळे कर्जत रेल्वे पोलीस टीमचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

कल्याण पूर्व येथील साईनगर खंडेगोळवाडी येथे राहणारी 21 वर्षीय अंकिता दाभोळकर ही कर्जत येथे आली होती. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास कर्जत रेल्वे स्थानक परिसरातील रेल्वे ओव्हरब्रीज चढून ही तरुणी वर आली असता तिला अचानक भोवळ आली आणि ती कोसळून बेशुद्ध पडली. त्याचवेळी ब्रीजवर पोलीस शिपाई संजय भोईर हे अंकिता दाभोळकरचे वाचले प्राण ड्युटीवर होते. त्यांनी धाव घेऊन अंकिताला खांद्यावर उचलून घेऊन वेगाने धावत कर्जत उपजिल्हा रुग्णालय गाठले आणि तिला उपचारासाठी दाखल केले.

रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी पुष्पा शिंग यांनी तिच्यावर तत्काळ औषधोपचार केल्याने ती शुद्धीवर आली. कर्जत रेल्वे पोलीस निरीक्षक तानाजी खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राज बागूल, माने, पोलीस शिपाई संजय भोईर, होमगार्ड मोरमारे यांच्या टीमने कर्तव्य तत्परतेने बजावलेल्या ड्युटीमुळे सुदैवाने अंकिताचे प्राण वाचले.