नाणे आणि टपाल तिकीट जारी! संविधान दिनी सरकार-विरोधक एकत्र

शाच्या राज्यघटनेला 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त जुन्या संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी एकाच मंचावर दिसले. कार्यक्रमाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपाध्यक्ष जगदीप धनखड, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, भाजप अध्यक्ष जे पी. नड्डा, संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू आणि राज्यसभेचे उपसभापती हरिवंश हेही उपस्थित होते. यावेळी एक नाणे आणि टपाल तिकीट जारी करण्यात आले.

यावेळी मेकिंग ऑफ द इंडियन कॉन्स्टिटय़ूशन- अ ग्लिम्प्स आणि मेकिंग ऑफ द इंडियन कॉन्स्टिटय़ुशन तसेच त्याचा गौरवशाली प्रवास या पुस्तकांचे प्रकाशनही करण्यात आले. संस्कृत आणि मैथिली  भाषेतील संविधानाच्या प्रतीही यावेळी उपस्थितांना देण्यता आल्या. भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीचे ऐतिहासिक महत्व आणि प्रवास दर्शविणारा लघुपटही यावेळी दाखवण्यात आला. दरम्यान, 75 वर्षांपूर्वी याच दिवशी संविधान सभेच्या त्याच सेंट्रल हॉलमध्ये संविधान सभेने संविधानाचा मसुदा तयार करण्याचे महान कार्य केले आणि स्वीकारले. आज देशाच्या वतीने मी संविधान सभेच्या सदस्यांचे आभार मानते, अशा भावना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केल्या.