म्हाडाच्या घरांची जाहिरात आली की अर्जदारांच्या अक्षरशः उडय़ा पडतात, मात्र म्हाडाच्या कोकण मंडळाच्या सोडतीमधील पंतप्रधान आवास योजनेतील घरांना अर्जदारांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाहीये. ही घरे विकण्यासाठी म्हाडातर्फे 1 ते 10 डिसेंबर या कालावधीत विशेष जाहिरात कॅम्पेन राबविण्यात येणार आहे. टीव्ही, हार्ंडग, गजबजलेल्या ठिकाणी स्टॉल्स अशा विविध माध्यमातून जाहिरातबाजी करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
म्हाडाच्या कोकण मंडळाने ऑक्टोबर महिन्यात 12 हजार 626 घरांच्या विक्रीसाठी जाहिरात काढली. ऑनलाईन तसेच ‘प्रथम येणाऱयास प्रथम प्राधान्य’ अशा दोन घटकांत ही सोडत विभागली आहे. या सोडतीत 11 हजार 176 घरे ‘प्रथम येणाऱयास प्रथम प्राधान्य’ तत्त्वावरील असून त्यातील 9875 घरे पंतप्रधान आवास योजनेतील आहेत. शिरढोण (कल्याण), खोणी (कल्याण), भंडार्ली (ठाणे), गोठेघर (ठाणे) आणि बोळींज (विरार) येथे ही घरे आहेत. 26 नोव्हेंबरपर्यंत 9875 घरांसाठी केवळ 581 अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 509 जणांनी अनामत रक्कम भरली आहे. त्यामुळे या घरांच्या विक्रीसाठी विशेष जाहिरात कॅम्पेन राबविण्याचा निर्णय म्हाडाच्या कोकण मंडळाने घेतला आहे. नुकतीच यासंदर्भात बैठकदेखील पार पडली आहे.
हार्ंडग, स्टॉल्स आणि मोबाईल व्हॅन
पंतप्रधान आवास योजनेतील घरे ठाणे, विरार आणि कल्याण परिसरात असल्याने याच ठिकाणी जाहिरात करण्यावर आमचा फोकस आहे. येथील पेट्रोल पंप, रेल्वे स्टेशन आणि सरकारी कार्यालये अशा गर्दीच्या ठिकाणी स्टॉल्स लावून या घरांची माहिती इच्छुकांना दिली जाईल. महत्त्वाच्या चौकावर हार्ंडग्स लावण्यात येतील. ज्यांना घरासाठी नवीन रजिस्ट्रेशन करायचे आहे किंवा ज्यांना रजिस्ट्रेशन करण्यात अडचणी येत आहेत त्यांना फॉर्म भरण्यास मदत व्हावी यासाठी तीन मोबाईल व्हॅन तैनात असतील, अशी माहिती म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱयाने दिली.