राज्यात स्वाइन फ्लूची रुग्णसंख्या दुपटीने वाढली, 57 जणांनी गमावला जीव

इन्फ्लुएंझा अर्थात स्वाइन फ्लू आजारात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दुपटीने वाढ झाली आहे. राज्यात जानेवारी ते 21 नोव्हेंबर या कालावधीत दोन हजार 325 रुग्ण आढळून आले आहेत. तर यामुळे 57 जणांना जीव गमवावा लागला असल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

जिल्हा पातळीवरील शासकीय रुग्णालयांमध्ये त्वरित वैद्यकीय उपचार, औषधे उपलब्ध करून दिली आहेत. तरीही राज्यात स्वाइन फ्लू या आजाराचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या वर्षी राज्यात 18 लाख 9 हजार 600 जणांची तपासणी करण्यात आली होती. यात 9 हजार 733 संशयित रुग्ण आढळून आले होते. 1 हजार 231 बाधित रुग्णांची नोंद झाली होती. तर या आजारामुळे 32 जणांचा मृत्यू झाला होता. यंदा 1 जानेवारी ते 21 नोव्हेंबर या कालावधीत 21 लाख 45 हजार 579 जणांची तपासणी केली असून यामध्ये 5720 संशयित आणि 2325 बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर या आजारात 57 जणांचा मृत्यू झाला आहे. यंदा सर्वाधिक 779 स्वाईन फ्लू रुग्णांची नोंद मुंबईमध्ये झाली आहे. पुणे शहरात 314, जिह्याच्या ग्रामीण भागात एक आणि ससूनमध्ये 25 रुग्ण आढळून आले आहेत.

अडीच हजार जणांनीच घेतली लस

तिसऱया महिन्यातील गरोदर माता, मधुमेह, उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींना आरोग्य विभागाकडून मोफत इन्फ्लुएंझा प्रतिबंधात्मक लस देण्यात येते. राज्यात आतापर्यंत केवळ 2 हजार 608 जणांनीच इन्फ्लुएंझा प्रतिबंधात्मक लस घेतली असून पुणे विभागात केवळ 9 जणांनी लस घेतली आहे. तर कोल्हापूर आणि अकोला जिह्यात आतापर्यंत एकाने लस घेतली नसल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालात नमूद केले आहे.

दोन वर्षांतील रुग्ण संख्या

                      2023                 2024

तपासण्या         1809600             2145579

संशयित रुग्ण     9733                  5720

बाधित रुग्ण       1231                  2325

मृत्यू                 32                     57

बरे झालेले रुग्ण                     2243

उपचार घेत असलेले                   25