महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार हे अद्याप ठरलेले नाही. महायुतीमधील नेत्यांच्या दिल्ली वाऱ्या सुरू आहेत. देवेंद्र फडणवीस आणि मिंध्यांचे कार्यकर्ते देव पाण्यात ठेवून बसले आहेत. समर्थन दाखवण्यातही चढाओढ सुरू आहे. मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत मिंध्यांपेक्षा फडणवीस आघाडीवर असले, त्यांच्या नावाची चर्चा असली तरी मुख्यमंत्री मात्र भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय निरीक्षकच ठरवणार आहेत. हे निरीक्षक लवकरच महाराष्ट्रात दाखल होणार आहेत.
शिवसेनेशी गद्दारी करून वेगळा गट स्थापन करणाऱ्या एकनाथ शिंदे यांना भाजपने त्यावेळी मुख्यमंत्री बनवले. देवेंद्र फडणवीस यांना मनाविरुध्द उपमुख्यमंत्री पद स्वीकारावे लागले होते. यंदाच्या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक 132 जागा जिंकल्याने आता फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्रीपदी यावेत असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी तर भाजप हायकमांडने फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे जाहीरही केले. पण फडणवीसांचे नाव असेच जाहीर केले गेले तर तो पक्षशिस्तीचा भंग होईल असा दावा भाजपवाले करत आहेत. निवडून आलेले आमदारच विधानसभेत बसणार असल्याने त्यांचे नेतृत्व किंबहुना सरकारचे नेतृत्व कुणी करावे याबाबत त्यांचे मत जाणून घेण्यासाठी भाजपचे केंद्रीय निरीक्षक उद्या महाराष्ट्रात येणार असल्याची माहिती आहे.
सागर बंगल्यावर मंत्रीपदासाठी इच्छुकांची मांदियाळी
सर्वाधिक जागा मिळवल्याने सर्वाधिक मंत्रिपदे भाजपच्या वाटय़ाला येणार आहेत. त्यामुळे मंत्रिपदासाठी इच्छुक आमदारांची देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर मांदियाळी होत आहे. मागच्या वेळी मंत्रिपद हुकलेल्या आमदारांचा विचार यावेळी केला जावा असा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला असल्याचे समजते.
अजितदादा शांत का, मुख्यमंत्री व्हायचंय ना
फडणवीस आणि शिंदे यांचे कार्यकर्ते ज्या पद्धतीने मुख्यमंत्री पदासाठी आग्रही आहेत तसे अजित पवार यांचे कार्यकर्ते दिसत नाहीत. त्यांनी केवळ हार्ंडगवर अजितदादांचा मुख्यमंत्री म्हणून उल्लेख केला आहे. एकनाथ शिंदे शिवसेनेचे आमदार फोडून घेऊन आले म्हणून भाजपने त्यांना मुख्यमंत्री पदाचे बक्षीस अनपेक्षितपणे दिले होते. अजितदादाही राष्ट्रवादीचे 40 आमदार पह्डून महायुतीमध्ये आल्याने त्यांनाही भाजपकडून यावेळी मुख्यमंत्री पद दिले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशीही चर्चा सुरू आहे.़