सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीमधील वाढीव मते आणि गोंधळाचा निकाल अद्याप लागलेला नसताना नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत एकूण मतदानापेक्षा तब्बल 5 लाख 4 हजार 313 मते अधिक मोजली गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्यात 6 कोटी 40 लाख 88 हजार 195 मतदारांनी मतदान केले, मात्र 6 कोटी 45 लाख 92 हजार 508 मते मोजली गेली. त्यामुळे वाढलेली 5 लाखांवर मते आली तरी कुठून असा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यात बहुतांश पराभूत उमेदवारांकडून ईव्हीएमवर संशय व्यक्त केला जात असताना वाढीव मतांचा प्रकार समोर आल्याने मतदान प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
महाराष्ट्रात नुकतीच 288 विधानसभा मतदारसंघांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. यामध्ये मतदानापासून मतमोजणीपर्यंत संपूर्ण प्रक्रियेच्या टप्प्याटप्प्यावर गोंधळ, गडबड आणि घपला झाल्याच्या तक्रारी येत आहेत. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत झालेल्या गोंधळानंतरही विधानसभा निवडणुकीत असे प्रकार घडल्याने निवडणूक आयोगाच्या माहितीत पारदर्शकता नसल्याचे आणि निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. यामुळेच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत प्रत्यक्ष झालेले मतदान आणि मतमोजणी यात अनेक मतदारसंघांत तफावत आढळून आली आहे. तसेच ईव्हीएमबाबतही अनेक पक्षांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. निवडणुकीच्या निकालांमधील विसंगती आणि याबाबतच्या अनेक तक्रारी येत आहेत, मात्र त्यावर निवडणूक आयोगाकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात येत नसल्यामुळे निवडणूक प्रक्रियेवरच संशय निर्माण होत आहे.
चर्चा व्हायला हवी -सुप्रिया सुळे
ईव्हीएमवर सर्वांचा संशय वाढत असला तरी त्याद्वारे घोटाळा झाला असेल तर त्याचे पुरावे जमा करून निवडणूक आयोगाकडे गेले पाहिजे, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष-खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. विरोधी पक्षांची एक दिवस कार्यशाळा आयोजित करावी आणि सर्वांची मते ऐकून घ्यावीत. महाराष्ट्र आणि हरियाणातील अनुभवावर चर्चा व्हावी. नंतर निवडणूक आयोगाकडे सर्वांनी गेले पाहिजे. 50 टक्केही ईव्हीएमवर कुणाचा संशय असेल तर या देशातील सरकार कधीच बदलणार नाही आणि सशक्त लोकशाहीसाठी ते योग्य नाही, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
मतदान झाले 312, मतमोजणीत निघाले 624 – जितेंद्र आव्हाड
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ईव्हीएमचा कोथळाच काढला आहे. त्यांनी सांगितले की, कन्नड मतदारसंघातील तळनेर गावात 396 मतदार आहेत. त्यातील 312 जणांनीच मतदान केले होते मात्र शिवसेनेच्या उमेदवाराला 194, शिंदे गटाच्या उमेदवाराला 326 आणि अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना 104 इतकी मते मिळाली. त्यांची बेरीज केली तर मतदारांच्या संख्येपेक्षा दुप्पट 624 इतकी होते. हे कसं काय. या प्रश्नाचे उत्तर कोण देणार? असा सवाल करतानाच, लवकरच हा सर्व प्रकार पुराव्यानिशी उघडकीस आणू असा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे. नाशिक जिह्यातील 12 आमदारांच्या मतांची आकडेवारीच त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून…ही ईव्हीएमची कमाल, असे नमूद केले आहे.
नवापूर मतदारसंघात 2 लाख 40 हजार 22 लोकांनी मतदान केले, मात्र निकालाच्या दिवशी 2 लाख 41 हजार 193 मते मोजण्यात आली. म्हणजेच 1 हजार 171 मते येथे जास्त मोजली गेली आणि येथील विजयी उमेदवाराचे मताधिक्य अवघे 1 हजार 122 आहे.
आठ मतदारसंघांमध्ये मोजलेल्या मतांची संख्या मतदानापेक्षा कमी आहे, तर 280 मतदारसंघांत प्रत्यक्ष मतदानापेक्षा मोजणी करण्यात आलेल्या मतांची संख्या जास्त आहे.
दोन मतदारसंघांत मोठी तफावत आढळली. आष्टी मतदारसंघात मतदानापेक्षा 4,538 मते जास्त मोजली गेली, तर धाराशीव मतदारसंघात 4,155 मतांचा फरक होता.
मावळ मतदारसंघात 2 लाख 80 हजार 319 मतदारांनी मतदान केले. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार येथे 2 लाख 79 हजार 081 मतांची मोजणी करण्यात आली. म्हणजेच मतदानापेक्षा मतमोजणीत 1 हजार 238 मते कमी झाल्याचे समोर आले.