विधान परिषदेच्या सहा रिक्त जागांसाठी लवकरच पोटनिवडणूक होणार

राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत विधान परिषदेतील महायुतीचे सहा आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे या विधान परिषदेच्या सहा जागांसाठी लवकरच पोटनिवडणुका होतील.

शिंदे गटाचे आमश्या पाडवी, भाजपचे रमेश कराड, प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर, चंद्रशेखर बावनकुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राजेश विटेकर निवडून आले. यापैकी पाडवी हे अक्कलकुवा, दटके नागपूर मध्य, पडळकर जत, बावनकुळे कामठीमधून, तर विटेकर हे पाथरी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत.

 एकाचवेळी दोन सभागृहांचे सदस्य असण्यास प्रतिबंध करण्याबाबतचा अधिनियम, 1957 च्या अनुच्छेद 3 नुसार या नवनिर्वाचित सहा विधानसभा सदस्यांना विधान परिषदेचा राजीनामा देण्याची आवश्यकता नाही;  कारण विधानसभा सदस्य म्हणून त्यांचे नाव राजपत्रात प्रसिद्ध होताच आपोआप त्यांचे अगोदरचे विधान परिषदेचे सदस्यत्व रद्द होते.