निफाड गारठले; पारा 8 अंशांवर, नाशिकचे तापमान 10 अंश सेल्सिअस

जिह्यात थंडीचा कडाका दिवसागणिक वाढत चालला आहे. निफाडजवळील पुंदेवाडी येथे आज मंगळवारी या मोसमातील नीचांकी 8.8 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. यामुळे पहाटे आणि रात्री येथे गारठल्यागत स्थिती होती. तर नाशिकच्या तापमानात चोवीस तासात 1.2 अंशांनी घट होऊन पारा 10.8 अंशावर घसरला. पुढील काही दिवस थंडीची लाट कायम राहण्याचा अंदाज आहे.

मागील वर्षी ऑक्टोबरअखेर थंडीची चाहूल लागली. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवडय़ात आधी अवकाळी पाऊस झाला, त्यानंतर दिवाळीत किमान तापमान 12 ते 14 अंश सेल्सिअस होते. पुढे महिनाअखेरीस पुन्हा अवकाळी पावसासह गारपीटीचा फटका बसला, त्यामुळे तापमानात चढ-उतार सुरू होती. त्यातुलनेत यावर्षी थंडीचा कडाका डिसेंबरआधीच वाढला आहे. निफाड येथे मागील आठवडय़ात बुधवारी 10.3 अंशांवर पारा घसरला. त्यानंतर त्यात वाढ झाली होती, सोमवारी पुन्हा तो 10 वर खाली आला आणि आज मंगळवारी 8.8 इतकी नोंद झाली. येथे कमाल तापमान 27.5 नोंदवले गेले. नाशिक शहरातही आज कमालीचा गारठा होता. येथे सोमवारी 12 तर आज 10.8 अंश सेल्सिअस किमान तापमान होते. दिवसभर बोचऱ्या वाऱ्यामुळे थंडीचा कडाका कायम होता. यामुळे उबदार कपडय़ांचा तसेच शेकोटीचा नागरिकांना आधार घ्यावा लागला.

द्राक्ष उत्पादक चिंताग्रस्त

तापमानात मोठी घट झाल्याने द्राक्ष उत्पादक चिंताग्रस्त झाले आहेत. सध्या जिह्यात किमान तापमान 8 ते 11 अंशांदरम्यान आहे. ते आणखी खाली घसरल्यास द्राक्षबागांसाठी धोकादायक ठरू शकते, त्यामुळे बागांमधील तापमान हे पाणी मारून नियंत्रित ठेवण्याची उत्पादकांची लगबग सुरू आहे.