पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या सुटकेच्या मागणीसह अन्य मागण्यांसाठी इम्रान खान समर्थकांनी इस्लामाबादजवळ धडक दिली. या आंदोलनाला हिंसक वळण लागले असून हिंसाचार रोखण्याचा प्रयत्न करणारे तब्बल शेकडोहून अधिक पोलीस जखमी झाले आहेत. तर सहा सुरक्षा जवानांची हत्या करण्यात आली. लष्कराने शिपिंग पंटेनर्स लावून राजधानीकडे जाणारा महामार्ग रोखला होता; परंतु आंदोलकांनी लिफ्टिंग मशीन आणि अनेक अवजड मशीन्सच्या मदतीने बॅरिकेड्स तोडले आणि इस्लामाबादमध्ये धडक दिली.
श्रीनगर महामार्गावर आंदोलकांनी सुरक्षा दलांवर हल्ला केला. यात 4 सैनिक आणि 2 पोलिसांचा चिरडून मृत्यू झाला. या घटनेत 5 जवान आणि 2 पोलीस जखमी झाले. या हिंसाचारात आतापर्यंत 100 हून अधिक पोलीस जखमी झाले असून अनेकांची प्रकृती गंभीर आहे. दुसरीकडे इम्रान खान यांच्या पक्षानेही आपले मोठय़ा संख्येने कार्यकर्ते जखमी झाल्याचा दावा केला आहे. दरम्यान, इस्लामाबादमध्ये मोबाइल सेवा बंद ठेवण्यात आली आहे. संपूर्ण शहरात पोलिसांचा फौजफाटा वाढवण्यात आला आहे.
आंदोलकाना गोळय़ा घालण्याचे आदेश
हिंसाचार रोखण्यासाठी राजधानी इस्लामाबादमध्ये कलम 245 लागू करण्यात आले आहे. आंदोलकांना दिसताक्षणीच गोळय़ा घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कोणत्याही भागात संचारबंदी लागू करण्याचा अधिकार पाकिस्तानी लष्कराला देण्यात आला आहे.
आंदोलक डी चौकात दाखल
खैबर पख्तुन्ख्वाचे मुख्यमंत्री अली अमीन गंडापूर आणि इम्रान खान यांच्या पत्नी बुशरा बीबी यांचा ताफा रविवारी इस्लामाबादच्या दिशेने निघाला होता. आज हा ताफा इस्लामाबादचा सर्वात हाय प्रोफाईल परिसर असलेल्या डी चौकात पोहोचला. राष्ट्रपती भवन, पंतप्रधान कार्यालय, संसद भवन आणि सर्वोच्च न्यायालय या भागात आहे. आंदोलकांना पांगवण्यासाठी सुरक्षा दलाच्या जवानांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. आंदोलकांनी जवानांच्या दिशेने तुफान दगडफेक केली. आंदोलकांनी बेचक्यांचाही वापर केल्याने यात अनेक जवान जखमी झाले.