मणिपूरच्या इंफाळ भागात आज लष्कराच्या छावणीतून लैश्राम कमलबाबू सिंग (55) ही व्यक्ती बेपत्ता झाली. लैश्राम सिंग हे कांगपोकपी येथील लिमाखॉन्ग आर्मी कॅम्प येथे कर्तव्य बजावण्यासाठी घराबाहेर पडले होते तेव्हापासून ते बेपत्ता आहेत. मोबाईल बंद आहे. या घटनेनंतर लैश्राम यांना शोधण्यासाठी निघालेल्या ग्रामस्थांना लष्कराने रोखले. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी सरकारविरोधात रास्ता रोको केला.
11 नोव्हेंबर रोजी कुकी दहशतवाद्यांनी जिरीबाम येथून सहा मैतेईंचे अपहरण करून त्यांची हत्या केली. त्यांचे मृतदेह नदीत सापडले. तेव्हापासून मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू आहे. आता आणखी एक व्यक्ती बेपत्ता झाल्याने मणिपूरमध्ये पुन्हा तणावाचे वातावरण आहे. दरम्यान, सहा मैतेईंचे मृतदेह सापडल्यानंतर आक्रमक झालेल्या जमावाने 10 हून अधिक भाजपा आमदारांची घरे पेटवून दिली होती. मोठय़ा प्रमाणावर मालमत्तेचे नुकसान केले होते. याप्रकरणी ‘एनआयए’ अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेने तीन गुन्हे दाखल केले आहेत.
संचारबंदीमुळे मणिपूरमध्ये शाळा आणि महाविद्यालये अनिश्चित काळासाठी बंद राहातील, अशी घोषणा आज सरकारने केली. इंफाळ पूर्व आणि पश्चिम, बिष्णुपुर, थौबल, काकचींग आणि जिरीबाम येथे बुधवारपासून सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यातयेणार आहेत.