रशियाने हिंदुस्थानला ‘टीयू- 160एम’ स्ट्रटेजिक बॉम्बर विमान देण्याची तयारी दर्शवली आहे. या बॉम्बरमुळे हिंदुस्थानी एअरफोर्सची ताकद निश्चितच वाढणार आहे. रशियाच्या ‘टीयू- 160एम’ या लांब पल्ल्याच्या बॉम्बवर्षक विमानाला ‘व्हाईट स्वान’ असेही म्हणतात. हे बॉम्बर शत्रूच्या मुलखात जाऊन कामगिरी बजावून परत येण्यात माहीर आहेत.
रशियाची कंपनी टुपोलोव्हचे ‘टीयू- 160एम’ विमान हे जगातील सर्वात जलद सुपरसोनिक बॉम्बर आहे. सोविएट संघाने 1970 साली त्याची निर्मिती केली. त्याचे उड्डाण डिसेंबर 1981 साली झाले होते. 1987 पासून हे विमान रशियन एअरोस्पेस फोर्समध्ये तैनात आहे. टीयू- 160एम नव्या व्हर्जनमध्ये एवियोनिक्स, नेविगेशन सिस्टीम, एनके- 32-02 इंजिन आहे. ते नॉनस्टॉप 12 हजार किलोमीटरपर्यंत उड्डाण करू शकते. त्यावरून अण्वस्त्र डागली जाऊ शकतात. खास डिझाईनमुळे कमी उंचीवरूनही जलदगतीने उड्डाण घेऊ शकतात. सर्व प्रकारच्या मोहिमांसाठी ते सक्षम आहे.
‘टीयू- 160एम’ विमान हिंद-प्रशांत क्षेत्रात विमान आपली ताकद दाखवेल. हिंदुस्थानी वायुदल सध्या लांब पल्ल्याच्या हल्ल्यासाठी सुखोई आणि राफेल यासारख्या लढाऊ विमानांचा वापर करत आहे. त्यामुळे हिंदुस्थानसाठी ‘टीयू- 160एम’ विमान पांढरा हत्ती तर ठरणार नाही असा सवाल उपस्थित झाला आहे.