पीएफ खात्यात 8505 कोटी बेवारस पडून

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) खात्यांमध्ये 8 हजार 505 कोटी रुपये बेवारस पडून आहेत. देशात निक्रिय खात्यांची संख्या वाढली असून या खात्यात पडून असलेल्या पैशांवर दावा करण्यासाठी कोणी पुढे येत नाही, अशी माहिती लोकसभेत देण्यात आली आहे. 2018-19 च्या तुलनेत 2023-24 या आर्थिक वर्षात निक्रिय ईपीएफ खात्यांमध्ये जमा रक्कम पाच पटीने वाढून 8,505.23 कोटी रुपये झाली आहे.

ही रक्कम आधी 2018-19 या आर्थिक वर्षात 1,638.37 कोटी रुपये इतकी होती, असे केंद्रीय राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी लोकसभेत सांगितले. कोणत्याही कर्मचाऱ्याचे पीएफ खाते निक्रिय होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. म्हणजेच तीन वर्षांपासून रक्कम जमा न होण्यापासून नोकरी बदलणे, नोकरी सोडणे, कर्मचाऱ्याचा मृत्यू इत्यादींचा समावेश आहे. निक्रिय खात्यांमध्ये जमा रकमेवर अजूनही लोक दावा करू शकतात. मात्र त्यासाठी काही प्रक्रिया अवलंबावी लागेल. निक्रिय खात्यात पडून असलेली रक्कम संबंधित लाभार्थ्यांना परत केली जाईल, असे केंद्रीय राज्यमंत्र्यांनी आश्वासन दिले. तीन वर्षांपर्यंत पीएफ खात्यात कोणतीही रक्कम जमा न केल्यास ते खाते निक्रिय मानले जाते. त्यात असलेली रक्कम ही तशीच पडून असते. पीएफ खाते नेहमी अप-टू-डेट ठेवणे आवश्यक आहे. केवायसी पूर्ण करण्याबरोबर पीएफची रक्कम जमा होते की नाही याची खात्री करणे आवश्यक आहे.