सोन्याच्या दरात मंगळवारी मोठी घसरण पाहायला मिळाली. सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा दर 1630 रुपयांनी घसरून प्रति 10 ग्रॅम सोने 75 हजार 451 रुपये झाले आहे. सोन्यासोबत चांदीच्या दरातसुद्धा घसरण झाली आहे. चांदी 1345 रुपयांनी घसरून प्रति किलो 88 हजार 100 रुपयांवर पोहोचली. मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा भाव आता 70 हजार 800 रुपयांवर पोहोचला आहे, तर 24 कॅरेट सोने 77 हजार 240 रुपयांवर पोहोचले आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियात नोकरीची सुवर्णसंधी
स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) मध्ये स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर अंतर्गत असिस्टंट मॅनेजर इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीसाठी शेवटची तारीख 12 डिसेंबर 2024 आहे. पात्र उमेदवार एसबीआयची अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज भरू शकतात. भरतीसाठी अर्ज फक्त ऑनलाइन भरता येऊ शकते. सर्व पदांसाठी ऑनलाइन लेखी परीक्षा असणार आहे. ही परीक्षा जानेवारी 2025 मध्ये घेतली जाईल.
पुढील आठवडय़ात सहा आयपीओ येणार
सध्या आयपीओची चलती आहे. पुढील आठवडय़ात बाजारात सहा आयपीओ येणार आहेत. राजेश पॉवर सर्व्हिसेस, राजपुताना बायोडिझेल, अपेक्स इकोटेक, अल्फा पॉवर ऍण्ड स्टील, अग्रवाल ग्लास इंडिया आणि गणेश इन्फ्रावर्ल्ड या सहा आयपीओंचा यात समावेश आहे. शेवटचा आयपीओ 29 नोव्हेंबरला येणार असून 3 डिसेंबरला बंद होणार आहे. हे सर्व आयपीओ एसएमई सेगमेंटमधील आहेत.
नवरीसाठी नवरदेवानं गावात आणलं थेट हेलिकॉप्टर
हौसेला मोल नसते, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. जळगावमध्ये एका नवरदेवानं नवरीला घेऊन जाण्यासाठी थेट हेलिकॉप्टर गावात आणलं. चाळीसगाव तालुक्यातील रांजणगाव येथील ही घटना आहे. लग्नात नवरदेवाने आपल्या पत्नीला सरप्राइज देत चक्क हेलिकॉप्टरने नववधूला आपल्या घरी गंगापूर येथे आणलं. चाळीसगाव तालुक्यातील रांजणगाव येथून नवरीची हेलिकॉप्टरमधून पाठवणी करण्यात आली.
ह्युंदाई इंडियाला पाच कोटींची टॅक्सची नोटीस
ऑटोमोबाईल कंपनी ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडला 5 कोटी रुपयांची कर थकवल्याप्रकरणी नोटीस पाठवली आहे. महाराष्ट्र राज्य कर प्राधिकरणाने ही नोटीस पाठवली असून 2021 ते 2022 या आर्थिक वर्षातील इनपूट टॅक्स क्रेडिट (आयटीसी) मधील अनियमितता साठी कंपनीला ही कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. कंपनीला एकूण 2.74 कोटी रुपयांची नोटीस आणि 2.27 कोटी रुपयांचे व्याज भरण्यास सांगितले आहे.