गुजराती EVM च्या विळख्यात महाराष्ट्राची लोकशाही अडकली का? आकडेवारी मांडत रोहित पवारांचा सवाल

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला पाशवी बहुमत मिळाले. विधानसभेचे निकाल अनपेक्षित लागल्याने अनेक नेत्यांनी ईव्हीएममवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. याबाबत अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही एक ट्विट शेअर केले आहे. गुजराती EVM च्या विळख्यात महाराष्ट्राची लोकशाही अडकली का? असा सवाल त्यांनी आकडेवारी मांडत केला.

नाशिक जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील विजयी उमेदवारांना मिळालेली मते जवळपास सारखीच कशी? एका सामान्य नागरिकाने सदरील आकडेवारी पाठवत विचारलेला हा प्रश्न नक्कीच विचार करायला भाग पाडतो, असे ट्विट रोहित पवार यांनी केले आहे.

निवडणूक आयोग तर समोर येऊन काय खरं – काय खोटं हे सांगायला तयार नाही. आयोग नेमकं काय लपविण्याचा प्रयत्न करत आहे? की लोकशाहीला उद्ध्वस्त करण्याचा विडा आयोगाने उचलला आहे? या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरे राज्यातील सामान्य जनतेला हवी आहेत. तरी आयोग जनभावना लक्षात घेऊन लवकरच स्पष्टीकरण देईल, ही अपेक्षा, अशी मागणी रोहित पवार यांनी केली.

आव्हाडांनीही केलं ट्विट

आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करुन हे पाहा अन् तुम्हीच ठरवा, अशा आशयाची पोस्ट करत 12 आमदारांच्या मतांची आकडेवारी शेअर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हा पक्ष यंदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी व महायुतीमधील संख्याबळात सर्वात कमी संख्याबळ असलेला पक्ष ठरला आहे. लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवणाऱ्या शरद पवारांच्या पक्षाला विधानसभा निवडणुकीत केवळ 10 जागा मिळाल्या आहेत.

बघा आणि तुम्हीच ठरवा, EVM ची कमाल! जितेंद्र आव्हाडांनी उपस्थित केला सवाल