कल्याणच्या शंकरा चौक परिसरात असलेल्या परेश ज्वेलर्स या दुकानावर भारतीय मानक ब्युरो (बीआयएस) च्या अधिकाऱ्यांनी आज मोठी कारवाई केली. हॉलमार्क नसल्याने 1610 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. या कारवाईसाठी बीआयएस अधिकाऱ्यांना स्थानिक पोलिसांचे सहकार्य लाभले.
बीआयएस अधिकाऱ्यांकडे एका ग्राहकाने ऑनलाइन तक्रार नोंदवली होती. परेश ज्वेलर्सच्या दुकानात विक्रीस असलेल्या दागिन्यांवर हॉलमार्क नसल्याचे तक्रारीत म्हटले होते. हॉलमार्क नसलेल्या दागिन्यांची विक्री करणे हा ग्राहकांच्या हक्काचा भंग आहे. तक्रारीच्या आधारे
बीआयएस अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई करत हे दागिने जप्त केले. कारवाईच्या वेळी बीआयएस अधिकारी अमन सिंग यांनी सांगितले की, ‘जर कोणत्याही ग्राहकाची अशा प्रकारे फसवणूक होत असेल तर त्यांनी बीआयएसकडे तक्रार नोंदवावी. हॉलमार्क नसलेले दागिने विक्रीसाठी ठेवणे हे कायद्याचे उल्लंघन आहे.’
हॉलमार्क हे सोन्याच्या दागिन्यांच्या शुद्धतेची हमी देणारे प्रमाण आहे. फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकांनी सोन्याचे दागिने खरेदी करताना हॉलमार्कची खात्री करावी, असे आवाहन बीआयएसने केले आहे.
एपीएमसीमध्ये अमली पदार्थांची विक्री जोरात
वाशी येथील सेक्टर 26 मधील मोकळ्या भूखंडावर गर्दुल्यांकडून अमली पदार्थांचे मोठ्या प्रमाणात सेवन केले जात आहे. याच ठिकाणी अमली पदार्थांच्या विक्रीचाही अड्डा आहे. खुलेआम अमली पदार्थ विकले जात असल्याने नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे. एपीएमसी परिसरातील एकतानगर झोपडपट्टी, कोपरी गाव सेक्टर 26 मध्ये अमली पदार्थांची विक्री केली जाते. साईबाबा मंदिराजवळ अमली पदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणात केली जात आहे. या ठिकाणी गामी जेड इमारतीजवळ सिडकोचा मोकळा भूखंड आहे. याच भूखंडात पडीक बांधकामाजवळ गर्दुल्यांची मोठी जत्रा असते. गर्दुल्यांमुळे या भागातून येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास होत आहे. अमली पदार्थ विकणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.