‘सैराट’मुळे जगभरात पोहोचलेले प्रसिद्ध दिग्दर्शक यांचा ‘खाशाबा’ हा चित्रपट वादात अडकला आहे. पुणे कोर्टाने नागराज मंजुळे यांना समन्स पाठवले आहे. कॉपीराईटचे उल्लंघन केल्याप्रकरणी पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाने नागराज मंजुळे यांच्यासह जिओ स्टुडियो, आटपाट प्रोडक्शन, निर्माती ज्योती देशपांडे यांना समन्स पाठवले आहे.
नक्की प्रकरण काय?
दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी घोषित केलेल्या खाशाबा जाधव यांच्या चित्रपटातील कथा वादाच्या भोवर्यात सापडली आहे. मूळ कथा लेखक संजय दुधाणे यांची असून त्यांनी कॉफीराईटबाबत दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्यासह जिओ स्टुडियो, आटपाट प्रोडक्शन, निर्माती ज्योती देशपांडे यांच्या विरोधात पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात दावा दाखल केला आहे. याबाबत न्यायालयाने दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्यासह सर्वांना समन्स पाठवले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खाशाबा जाधव यांच्या चरित्र पुस्तकाचे हक्क 2001 पासून संजय दुधाणे यांच्याकडे आहेत. भारत सरकारच्या कॉफी राईट कार्यालयाचे प्रमाणपत्रही दुधाणे यांच्याकडे आहे. चित्रपटाच्या निर्मिती व प्रदर्शन करण्यास निरंतर मनाई व ठरावासाठी दुधाणे यांच्याकडून अॅड. रविंद्र शिंदे व अॅड. सुवर्णा शिंदे यांनी पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात दावा दाखल केला आहे. याबाबत जातीने हजर रहाण्याचे समन्स न्यायालयाने दिग्दर्शक नागराज मंजुळे व ज्योती देशपांडे यांना पाठवले आहेत.
संजय दुधाणे लिखित ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव हे खाशाबांवरील पहिलेच व एकमेव पुस्तक आहे. यासाठी खाशाबांच्या काळातील कुस्तीगीरांची भेट घेऊन परिपूर्ण माहिती एकत्रित केली होती. दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते 2001 मध्ये या पुस्तकाचे प्रकाशन झाले होते. ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव या पुस्तकाची विक्रमी 15 वी आवृत्ती प्रकाशित झाली असून, या पुस्तकाला 2008 मध्ये सर्वोत्कृष्ठ क्रीडा पुस्तकाचा राज्यपुरस्कारही मिळाला आहे.
2004 मध्ये इयत्ता 9 वी व 2015 मध्ये इयत्ता 6 वीच्या पाठ्यपुस्तकात या पुस्तकातील पाठ समाविष्ट करण्यात आला आहे. याच पुस्तकाच्या आधारे तेजपाल वाघ यांनी चित्रपटाची पटकथा लिहिली होती. त्यांनी पटकथा व संशोधन सर्व नागराज मंजुळे यांच्याकडे सुपूर्त केले होते. असे असताना संजय दुधाणे यांना अंधारात ठेवून मंजुळे चित्रपट निर्मिती करीत असल्याने हा वाद न्यायालयाच्या दारात पोहचला आहे.