आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांची तब्येत बिघडली, चेन्नईतल्या रुग्णालयात दाखल

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांची तब्येत बिघडली आहे. छातीत दुखत असल्याने त्यांना चेन्नईच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

रुग्णालयात दाखल केल्यानंतर दास यांची प्रकृती स्थिर आहे. कुठलीही काळजी करण्याचे कारण नाही असे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. रिझर्व्ह बँक यावर लवकरच अधिकृत निवेदन सादर करेल. तसेच डॉक्टरही यावर मेडिकल बुलेटिन जारी करतील.

रिझर्व्ह बँकेच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार दास यांना गॅसचा त्रास झाला. त्यानंतर दास यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावर लवकरच अधिकृत निवेदन जारी करण्यात येईल असेही प्रवक्त्यांनी सांगितले.

शक्तिकांत दास यांचा गव्हर्नर म्हणून 10 डिसेंबर 2024 ला कार्यकाल संपणार आहे. पण केंद्र सरकार सलग दुसऱ्यांदा त्यांचा कार्यकाल वाढवतील असे सांगण्यात येत आहे. जर शक्तिकांत दास पुन्हा आरबीआयचे गव्हर्नर झाले तर हा एक विक्रम होईल.

डिसेंबर 2018 मध्ये उर्जित पटेल यांनी गव्हर्नर पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर शक्तिकांत दास यांची गव्हर्नरपदी नियुक्त करण्यात आले होते. तेव्हा केंद्र सरकार आणि आरबीआय मध्ये कटुता निर्माण झाली होती असं सांगितलं जात होतं.