राज्यात 4 हजार 136 उमेदवारांनी निवडणूक लढवली होती. त्यापैकी 3 हजार 515 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. एकूण 85 टक्के उमेदवरांची अनामत रक्कम जप्त झाली असून साडे तीन कोटी रुपये आयोगाने जप्त केले आहेत. हा आकडा गेल्या 10 वर्षातला सर्वाधिक आहे.
2014 साली राज्यात 4 हजार 119 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यापैकी 3 हजार 442 म्हणजेत 83 टक्के उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली होती. तर 2019 साली 80 टक्के उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली होती. आयोगाने तेव्हा 2.6 कोटी रक्कम जप्त केली होती. लोकप्रतिनीधी कायदा 1951 नुसार ज्या उमेदवाराला एकूण मतदानापैकी 1/6 सुद्धा मतं मिळत नाहीत त्यांची अनामत रक्कम जप्त केली जाते.
विधानसभा निवडणुकीसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारा 10 हजार तर अनुसूचित जाती/जमातीच्या उमेदवारांना 5 हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागते. मुंबई उपनगरात 261 तर पुण्यात 260 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात अजित पवार गटाच्या पाच उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. तर दर्यापूर मतदारसंघात शिंदे गटाच्या उमेदवाराची अनामत रक्कम जप्त झाली आहे.
वंचित बहुजन आघाडी, बसपा आणि मनसेच्या सर्वाधिक उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. फक्त माहिममध्ये मनसे उमेदवार अमित ठाकरे यांना अनामत रक्कम वाचवण्यात यश आले आहे.