अखेर खुर्ची गेली! एकनाथ शिंदे यांनी दिला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला पाशवी बहुमत मिळाले. यानंतर सत्तास्थापनेला वेग आला आहे. महायुतीचा मुख्यमंत्री कोण होणार हे अद्याप निश्वित नसले तरी दिल्लीतून भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे वृत्त माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. यामुळे एकीकडे मिंधे गटात नाराजी असताना दुसरीकडे घटनाबाह्य पद्धतीने खुर्चीवर विराजमान झालेल्या एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.

आज महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ संपला. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी राजभवनावर जाऊन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सोपवला. यावेळी त्यांच्याबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते. राज्यपालांनी शिंदे यांचा राजीनामा स्वीकारला असून नवीन सरकार स्थापन होत नाही तोपर्यंत त्यांची काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करत असल्याचे पत्र सुपूर्द केले.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांचा राजीनामा हा संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा असतो. त्यामुळे मुख्यमंत्री यांनी राजीनामा दिल्यानंतर सर्व मंत्रीमंडळाचा राजीनामा घटनेनुसार मानला जातो. आता नवीन सरकारचा शपथविधी होईपर्यंत शिंदे काळजीवाहू मुख्यमंत्री असतील.

‘वर्षा’वर येऊ नका!

दरम्यान, मुख्यमंत्रीपद हातचे जाणार यामुळे सैरभैर झालेल्या मिंधे गटातील काही नेत्यांनी कार्यकर्त्यांना वर्षा निवासस्थानी जमण्याचे आवाहन केले होते. मात्र एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत कार्यकर्त्यांनी वर्षावर येऊ नये असे स्पष्ट केले. कार्यकर्त्यांनी वर्षा निवासस्थान किंवा अन्य कुठेही एकत्र जमू नये, असे आवाहन त्यांनी केले.

खरेदी-विक्रीत भाजप माहीर; शिंदे-अजित पवारांचा पक्षही फोडू शकतात, संजय राऊत यांनी घेतला समाचार