खरेदी-विक्रीत भाजप माहीर; शिंदे-अजित पवारांचा पक्षही फोडू शकतात, संजय राऊत यांनी घेतला समाचार

विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष बहुमतापर्यंत पोहोचलेला आहे. पूर्ण बहुमत नसले तरी भाजप खरेदी-विक्रीमध्ये माहीर आहे. त्यामुळे ते शिंदे-अजित पवारांचा पक्षही फोडू शकतात, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केली. तसेच नैतिकतेच्या आधारावर पाहिले तर देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री बनतील, असे आपल्याला वाटत असल्याचेही राऊत म्हणाले.

मंगळवारी सकाळी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांना विचारले असता ते म्हणाले की, कोण मुख्यमंत्री होणार यामध्ये मला रस नाही. आज 26 तारीख असून विधानसभेची मुदत संपत आहे. सरकार स्थापनेचा शेवटचा दिवस आहे. आम्ही सरकार बनवू अशी परिस्थिती निर्माण झालेले तेव्हा 26 तारखेपर्यंत सरकार स्थापन झाले नाही तर राष्ट्रपती राजवट लावली जाईल अशा धमक्या दिल्या जात होत्या आणि आता हेच लोक घटनेमध्ये अशी तरतूद नसल्याचे बोलत आहेत. याचा अर्थ कायद्याचे राज्यात यांच्यासाठी वेगळा नियम आणि इतरांसाठी वेगळा नियम, असे संजय राऊत म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, आज संध्याकाळपर्यंत महाराष्ट्राला मुख्यमंत्री मिळेल अशी आम्हाला आशा आहे. राज्याला एक नेतृत्व मिळावे असे वाटते. ते कोण असेल हे शेवटी दिल्लीतील अमित शहा किंवा नरेंद्र मोदी ठरवतील. भाजपकडे स्वत:चे बहुमत असल्याने त्यांचा सरकार स्थापनेचा हक्क आहे, असे वाटते.

फडणवीस होणार मुख्यमंत्री, शिंदे आणि अजितदादा ‘उप’च

मुख्यमंत्रीपदासाठी अडीच-अडीच वर्षाचा फॉर्म्युला वापरला जाण्याची शक्यता वर्तवली जात असून यावरही राऊत यांनी भाष्य केले. आम्ही सांगत होतो तेव्हा हा फॉर्म्युला मान्य नव्हता. तेव्हाच हा फॉर्म्युला मान्य केला असता तर अनेक घडामोडी टळल्या असत्या. पण फक्त उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला त्रास द्यायचा होता, पक्ष फोडायचा होता म्हणून तो फॉर्म्युला पाळला नाही. पण आता ते काहीही करायला तयार आहेत. यातून महाराष्ट्र आणि शिवसेनेविषयी त्यांच्या मनात किती द्वेष आहे हे दिसते, असेही राऊत म्हणाले.