कांदा खरेदी करून पैसे न देता व्यापारी फरार, संतप्त शेतकऱ्यांचा बाजार समितीच्या सभापतीला घेराव

onion

शेतकऱ्यांचा कांदा खरेदी करून त्या मालाची रक्कम न देता बाजार समितीचा व्यापारी फरार झाला. या मालाचे पैसे देण्यात यावे, या मागणीसाठी संतप्त शेतकऱ्यांनी वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती यांना सोमवारी घेराव घातला. विधानसभा निवडणुकीचे कारण सांगून बाजार समितीच्या वतीने काही दिवसांपासून शेतकऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत होती. सोमवारी सकाळपासुनच मोठ्या प्रमाणात शेतकरी बाजार समितीमध्ये जमा झाले होते. अनेक शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात रकमा अडकल्याने शेतकरी आक्रमक झाले होते.

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचा कांदा व्यापारी सागर सुनील राजपूत रा. मकरमतपूरवाडी याची साई बालाजी ट्रेडींग कंपनी आहे. या व्यापाऱ्याने 1 ते 27 ऑक्टोबर या कालावधीत ४०६ शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी केला होता. या कांद्याची किंमत 2 कोटी 5 लाख 75 हजार 497 इतकी होती. हा कांदा खरेदी केल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना रक्कम न देता व्यापारी सागर राजपूत हा फरार झाला होता त्यामळे शेतकऱ्यांनी 15 दिवसांपूर्वी कांदा व मका मार्केट बंद केले होते. बाजार समितीचे सचिव प्रल्हाद मोटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कांदा व्यापारी सागर राजपुत विरूद्ध फसवणुकीचा गुन्हा वैजापूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. परंतु अद्याप सागर राजपूत हा फरार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे दोन महिन्यांपासून लाखो रुपये अडकले आहेत.

शेतकरी वारंवार बाजार समितीत पैशासाठी चकरा मारत आहे. बाजार समीतीने जबाबदारी स्वीकारून शेतकऱ्यांना रकमा द्याव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. निवडणूकीचे कारण दाखवून शेतकऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत होती. मात्र निवडणूक संपल्यानंतर सोमवारी सकाळी शेतकरी मोठ्या संख्येने बाजार समीतीत दाखल झाले. त्यांनी सभापती रामहरी जाधव यांना घेराव घातला.

आमच्या मालाचे पैसे द्या. पैसे मिळे पर्यंत बाजार समितीची कांदा व भुसार खरेदी मार्केट बंद ठेवा, अशी मागणी केली. सायंकाळपर्यंत शेतकरी ठिय्या मांडून बाजार समिती कार्यालयात बसून राहिले. शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा पाहून सभापती रामहरी जाधव यांनी बाजार समितीचे मार्केट बंद करण्याचे तसेच वरीष्ठ कार्यालयाकडे पत्रव्यवहार करण्याचे लेखी आश्वासन दिले

दोन कर्मचारी निलंबित

कांदा व्यापारी फरार झाल्याने शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. यांस जबाबदार धरून बाजार समितीचे सचिव प्रल्हाद मोटे व कांदा मार्केट प्रमुख चंचलदास मते यांना निलंबित करण्यात आले आहे.

कांदा व मका व्यापारी उधारीवर खरेदी करतात

वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शेतकऱ्यांचा माल रोखीने खरेदी करण्यात येतो, असे सांगितले जाते. मात्र कांदा व मका खरेदी करणारे व्यापारी हे शेतकऱ्यांचा माल उधारीवर खरेदी करतात. माल खरेदी केल्यानंतर शेतकऱ्यांना साधारण पणे एक महिन्याचे वायदे करतात. काही शेतकऱ्यांना पुढील तारखेचे धनादेश देण्यात येतात.

सागर राजपूतची अनामत जप्त; गाळा सील

सागर राजपूत यांची व जामीनदारांची 20 लाख रुपये अनामत बाजार समीतीकडे जमा आहे. ही रक्कम जप्त करण्यात आली आहे. तसेच त्याचा गाळा देखील सील करण्यात आला आहे. हा गाळा विकून येणारी रक्कम तसेच अनामत रक्कम शेतकऱ्यांना वाटप करण्यात येईल, अशी माहिती सभापती रामहरी जाधव यांनी दिली.