राज्यातील मिंधे सरकार निवडणुकीच्या कारस्थानामध्ये दंग असतानाच दुसरीकडे ठाण्याच्या मनोरुग्णालयातील सफाई कामगारांवर उपासमारीची वेळ आल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली आहे. 90 सफाई कामगारांचा ठेकेदाराने एक महिन्याचा पगार लटकवला असून घरभाडे, मुलांच्या शाळेची फी, किराणा, औषधपाणी यासाठी पैसे कुठून आणायचे, असा प्रश्न पडला आहे. दरम्यान, लाडकी बहीण योजना राबवण्यासाठी पैशांची खैरात केली जात आहे, पण मनोरुग्णालयातील सफाई कामगारांना पगार देण्यासाठी पैसे का नाहीत, असा संतप्त सवाल विचारण्यात येत आहे. विशेष म्हणजे रुग्णालयातील ठेकेदाराची मुदत संपूनही सफाई कामगारांच्या वेतनातून बेकायदेशीरपणे कपात केली जात असल्याचा आरोपही संघटनेने केला आहे.
ठाण्यातील तीन नाका येथे मनोरुग्णालय आहे. मनोरुग्णालयात जवळपास 90 सफाई कामगार गेल्या 16 वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने काम करत आहेत. हे कंत्राटी सफाई कामगार गरीब कुटुंबातील असून कामगारांना ऑक्टोबर महिन्याचे वेतन अद्यापही न मिळाल्याने कामगारांची अक्षरशः आर्थिक कोंडी झाली असून आता त्यांच्या कुटुंबीयांवर चक्क उपासमारीची वेळ आली आहे. या कर्मचाऱ्यांना दरमहा 7 तारखेच्या आत किमान वेतन अधिनियमानुसार वेतन अदा करण्याचे आदेश ठाणे औद्योगिक न्यायालयाने दिले असतानाही रुग्णालय प्रशासन आणि ठेकेदार मे. लोकराज्य स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था या पुण्यातील खासगी कंपनीने कामगारांची पिळवणूक सुरू केली असल्याचा आरोप कामगारांनी केला आहे.
संगनमताने कायदे गुंडाळले
ठेकेदार बिलाची रक्कम मिळाली नसल्याचे कारण पुढे करून कामगारांना दरमहा वेळेवर वेतन अदा करत नाही. खरे तर वेतन प्रदान अधिनियमानुसार ठेकेदाराने कामगारांना ७ तारखेच्या आत वेतन अदा करणे कायद्याने बंधनकारक आहे. करारनामा करताना किमान दोन-तीन महिने वेतन अदा करण्याची ठेकेदाराची क्षमता असल्याची अट असतानाही अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगनमताने सर्व कायदे गुंडाळून कंत्राटी कामगारांची पिळवणूक सर्रासपणे सुरू आहे.
पगार रखडल्याने कंत्राटी कामगारांमध्ये प्रचंड प्रमाणात असंतोष पसरला आहे. ठेकेदारांना राजाश्रय असल्याने संबंधित अधिकाऱ्यांना ठेकेदार जुमानत नाही. याप्रकरणी उपोषण करण्यात आले होते. त्यानंतर आश्वासन देण्यात आले. मात्र प्रशासनाने कामगारांची फसवणूक केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात सफाई कामगारांना न्याय मिळत नाही ही शोकांतिका आहे.
जगदीश खैरालिया, सरचिटणीस, श्रमिक जनता संघ युनियन.