प्रीतीसंगमावर काका–पुतण्याची भेट!

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त कराड येथील स्मृतीस्थळावर जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिवादन केले. यावेळी कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवारही आले होते. प्रीतीसंगमावर दोघेही समोरासमोर आल्यानंतर अजित पवार मिश्किलपणे रोहित पवारांना म्हणाले, ‘शहाण्या थोडक्यात वाचलास. माझी सभा झाली असती तर काय काय झालं असतं?’ दरम्यान काका-पुतण्याच्या या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

कर्जत-जामखेड मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार रोहित पवार यांनी भाजप उमेदवार राम शिंदे यांचा 1243 मतांनी पराभव केला आहे. कराडच्या प्रीतीसंगमावर अजित पवार आणि रोहित पवार समोरासमोर आले. त्यावेळी अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे या विजयाबद्दल भाष्य केले आणि विजयाबद्दल ‘ऑल द बेस्ट’ म्हटले.

काही प्रमाणात मतं वर-खाली झाली असती

या भेटीनंतर रोहित पवार पत्रकारांशी बोलताना म्हणाले, ‘नक्कीच, अजित पवारांची सभा माझ्या मतदारसंघात झाली असती तर काही प्रमाणात मतं वर-खाली झाली असती. कदाचित उलटा निकालदेखील लागू शकला असता. परंतु अजित पवार हे बारामतीत अडकून पडले होते. त्यांना माझ्या मतदारसंघात येता आले नाही.’ अजितदादा हे माझे काका आहेत. आमच्या घरातील वडिलधारे आहेत. आमच्या विचारात भिन्नता असली तरी घरातील ज्येष्ठांच्या पाया पडणं ही आपली संस्कृती आहे, म्हणून मी त्यांच्या पाया पडलो, असे रोहित पवार यांनी सांगितले.