कोर्ट शिपायाला धमकावणे अधिकाऱ्याच्या अंगलट, हायकोर्टाच्या दणक्यानंतर सादर केला माफीनामा

कोर्ट शिपायाने शांतता राखण्यास सांगितल्याचा राग अनावर झालेल्या नाशिक महापालिकेच्या उपायुक्ताला उच्च न्यायालयाने चांगलेच वठणीवर आणले. हे प्रकरण न्यायालयाने स्युमोटो सुनावणीसाठी दाखल करून घेतल्यानंतर या अधिकाऱयाने थेट माफीनामाच सादर केला.

मयूर पाटील असे या नाशिकच्या उपायुक्ताचे नाव आहे. या अधिकाऱयासोबत ऍड. दिनेश कदम यांनीदेखील कोर्ट शिपाई अतुल तायडेला धमकावले होते. ऍड. कदम यांनीही न्यायालयात माफीनामा सादर केला. उभयतांच्या बिनशर्त माफीनाम्याची नोंद करून घेत न्या. अजय गडकरी व न्या. कमल खाथा यांच्या खंडपीठाने स्युमोटो याचिका निकाली काढली.

यापुढे असे वागू नका

न्यायालयाने कारवाई केल्यास ऍड. कदम यांच्या करीअरवर परिणाम होईल, असे वरिष्ठ वकील राम आपटे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले. त्यानंतर ऍड. कदम व उपायुक्त पाटील यांनी बिनशर्त माफिनामाचे शपथपत्र न्यायालयात सादर केले. खंडपीठाने त्याची नोंद करून घेतली. महाराष्ट्रातील कोणत्याच कोर्टात यापुढे असे वर्तन करू नका, असा सज्जड दम खंडपीठाने या दोघांना दिला.

न्या. गडकरी यांच्या खंडपीठासमोर मुंबई महापालिका, म्हाडा संबंधित याचिकांवर सध्या सुनावणी होत आहे. त्यामुळे त्यांच्या कोर्टात सतत गर्दी असते. कोर्ट रूममध्ये व बाहेर शांतता राहावी यासाठी कोणालाही मोठय़ा आवाजात बोलू देऊ नका अथवा विनाकारण बोलत असलेल्यांना शांत करा, असे खंडपीठाने शिपायाला व पोलिसांना सांगितले आहे. त्यानुसार शिपाई तायडे यांनी कोर्ट रूमबाहेर बोलत असलेल्या उपायुक्त पाटील व ऍड. कदम यांना शांत राहण्याची विनंती केली. त्यामुळे संतापलेल्या अधिकाऱयाने तायडेचा हात पकडून ओढत नेले. तुझी तक्रार करू व संध्याकाळपर्यंत तुझी नोकरी जाईल, असे त्याला धमकावले. हा सर्व प्रकार तायडेने खंडपीठाला सांगितला. न्यायालयाने त्याची गंभीर दखल घेतली. या प्रकरणाच्या सुनावणीत ऍड. कदम यांनी स्वतःचे वर्तन योग्य असल्याचा दावा करण्याचा प्रयत्न केला. खंडपीठाने ते मान्य केले नाही. उपायुक्त पाटील व ऍड. कदम यांचे वर्तन योग्य नव्हते. ही घटना दुर्दैवी आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.