बहुचर्चित वरळी हिट ऍण्ड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाह व त्याचा चालक राजऋषी बिंडावतची अटक बेकायदा नसल्याचा महत्त्वपूर्ण निर्वाळा सोमवारी उच्च न्यायालयाने दिला.
अटक करताना पोलिसांनी आम्हाला अटकेची कारणे लेखी स्वरुपात दिली नव्हती. आमची अटक बेकायदा आहे. त्यामुळे कारागृहातून तत्काळ सुटका करण्याचे आदेश न्यायालयाने द्यावेत, अशी मागणी करत शाह व बिंडावतने न्यायालयात धाव घेतली होती. न्या. भारती डांगरे व न्या. मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठासमोर त्यांच्या याचिकेवर सुनावणी झाली. उभय पक्षांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यावर खंडपीठाने यावरील निर्णय राखून ठेवला होता. सोमवारी निकाल देत खंडपीठाने या याचिका फेटाळून लावल्या.
शहाचा दावा
अटक करताना आरोपीला अटकेची कारणे लेखी स्वरुपात देणे बंधनकारक आहे. तशी तरतूद कायद्यातच करण्यात आली आहे. अटक करते वेळी आम्हाला अटकेची कारणे लेखी स्वरुपात पोलिसांनी दिली नाहीत. त्यामुळे ही अटकच बेकायदा आहे, असा दावा करत आमची तत्काळ कारागृहातून सुटका करण्याचे आदेश न्यायालयाने द्यावेत, अशी मागणी शाह व त्याचा चालक बिंडावतने केली होती.
काय आहे प्रकरण
वरळी येथे 7 जुलै 2024 रोजी हे हिट ऍण्ड रन प्रकरण घडले. मिहीर शहाच्या आलिशान कारने दुचाकीला धडक दिली. दुचाकीवरील कावेरी नाखवाला कारने फरफटत नेले. यात कावेरीचा मृत्यू झाला. तिचा पती प्रदीप जखमी झाला. ही घटना घडली तेव्हा चालक बिंडावत हा शहाच्या सोबत होता. घटना घडल्यानंतर शहाने तेथून पळ काढला. मिंधे गटाचा नेता राजेश शहाचा मुलगा म्हणून मिहीरला अटक करण्यात पोलीस दिरंगाई करत असल्याचा आरोप झाला. दोन दिवसांनी शाहला अटक झाली.