फिरकीवीर रोनील झांजनीच्या (25 धावांत 6 विकेट ) माऱयापुढे अंजुमन इस्लाम संघ अवघ्या 109 धावांत आटोपला आणि अल बरकत इंग्लिश शाळेने हॅरिस शिल्ड आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेच्या सुपर लीग सामन्यात पहिल्या दिवशी 6 बाद 216 अशी मजल मारत सामन्यावर आपली पकड मजबूत केली. तसेच मॉडर्न इंग्लिश, अंजुमन इस्लाम इंग्लिश आणि पराग इंग्लिश शाळेने पहिल्या दिवसात दमदार खेळ केला.
मुंबई शालेय क्रीडा संघटनेच्या वतीने गेली 128 वर्षे आयोजित केल्या जात असलेल्या हॅरिस शिल्ड या शालेय क्रिकेट जगतातील मानाच्या स्पर्धेत आज सुपर लीग सामन्यात प्रथमच संघटनेने एसजी पंपनीच्या पुरस्काराने शालेय क्रिकेटपटूंना टी शर्ट, पॅप देण्यात आले. तसेच या स्पर्धेत आतापर्यंत 200पेक्षा अधिक झालेल्या सामन्यांना प्रथम श्रेणी क्रिकेट दर्जाचे चेंडू एसजी पंपनीच्या वतीने दिल्यामुळे शालेय खेळाडूंनाही प्रथम श्रेणी सामने खेळत असल्याचा अनुभव आला. आजपासून सुरू झालेल्या सुपर लीगमध्ये चार संघांचे दोन गट पाडले असून प्रत्येक संघ तीन सामने खेळेल. हे दोन दिवसीय सामने 28-29 नोव्हेंबर आणि 2-3 डिसेंबरला खेळले जातील. यातून अव्वल दोन-दोन संघ उपांत्य फेरीत धडक मारतील. उपांत्य फेरीचे सामने तीन दिवसीय खेळविले जाणार असून ते 9 ते 11 डिसेंबर दरम्यान वांद्रे – कुर्ला संकुल आणि पारसी जिमखाना येथे रंगतील. तसेच अंतिम सामना ब्रेबर्न स्टेडियमवर 16 ते 18 डिसेंबर दरम्यान खेळविला जाणार असल्याची माहिती मुंबई शालेय क्रीडा संघटनेच्या क्रिकेट विभागाचे सचिव नदीम मेमन यांनी दिली.
संक्षिप्त धावफलक ः जनरल एज्युकेशन अॅपॅडमी ः सर्व बाद 123 (अमोघ पाटील 35; शाश्वत नाईक 4/30) वि. मॉडर्न इंग्लिश स्कूल ः 23 षटकांत 2 बाद 100 (देवेश बिर्जे 38, ऋषभ सडाके 37); अंजुमन इस्लाम (उर्दू)ः सर्व बाद 109 (दनयाल सिद्दिकी ना. 67, रोनील झांजनी 6/25) वि. अल बरकत इंग्लिश ः 6 बाद 214 (वरद मगर 61, देवेन यादव ना. 72); अंजुमन इस्लाम (इंग्लिश) ः सर्व बाद 218 (हमजा खान 31, अरहान पटेल 36; झैद खान 6/67) वि. ज्ञानदीप सेवा मंडळ ः 1 बाद 30; माटुंगा प्रीमियर ः सर्व बाद 101 (शौर्य गायकवाड 44; नीरज धुमाळ 4/22) वि. पराग इंग्लिश स्कूल ः 3 बाद 210 (समृद्ध भट 86, श्रीहान हरीदास 61).