महिला लीगवर फोर्ट यंगस्टर्सचाच कब्जा

 

गतविजेत्या फोर्ट यंगस्टर्सच्या महिलांनी एमसीए महिला क्रिकेट लीग स्पर्धेवर पुन्हा एकदा आपला हक्क गाजवला. अंतिम फेरीत त्यांनी दहिसर स्पोर्टस् क्लबवर 126 धावांनी मात करत आपले जेतेपद राखण्याचा करिष्मा केला. अष्टपैलू जान्हवी काटेच्या (86 धावा आणि 5 विकेट) अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर फोर्ट यंगस्टर्सला ही किमया साधता आली.

साखळीतील शेवटच्या सामन्यात फोर्ट यंगस्टर्सनी 40 षटकांत 8 बाद 199 धावांची मजल मारली. जान्हवीने 91 चेंडूंमध्ये 14 चौकारांसह 86 धावांची चमकदार खेळी करताना संघाला दोनशेच्या घरात पोहोचवले. मानसी पाटीलने 43 धावा करताना त्याला चांगली साथ दिली. प्रतिस्पर्ध्यांचे मोठे आव्हान दहिसर एससीला पेलवले नाही. त्यांचा डाव 34.4 षटकांत अवघ्या 73 धावांमध्ये आटोपला. जान्हवी काटेने 7 धावांमध्ये निम्मा संघ गारद करताना मोठा विजय आणखी सुकर केला.

अन्य लढतीत व्हिक्टरी सीसीने ग्लोरियस सीसीवर 10 विकेट राखून मात केली. त्यात महेक पोकर (98 चेंडूंत 87 धावा) चमकली. राजावाडी एससीने पय्याडे एससीला 5 विकेटस्नी हरवले.

संक्षिप्त धावफलक ग्लोरियस सीसी ः 40 षटकांत 8 बाद 176 (साध्वी संजय 91, नियती जगताप 3/31) वि. व्हिक्टरी सीसी – 28 षटकांत बिनबाद 178 (महेक पोकर 87, अलिना मुल्ला 7; पर्ह्ट यंगस्टर्स – 40 षटकांत 8 बाद 199 (जान्हवी काटे 86, मानसी पाटील 43, साक्षी गावडे 3/16, वैष्णवी देसाई 3/33) वि. दहिसर एससी – 34.4 षटकांत सर्वबाद 73 (जान्हवी काटे 5/7); पय्याडे एससी – 40 षटकांत सर्वबाद 179 (तनिषा गायकवाड 87) वि. राजावाडी एससी – 27.1 षटकांत  5 बाद 180 (तुशी शहा 34, सलोनी कुष्टे 31, क्षमा पाटेकर ना. 31, निविया आंब्रे ना. 32, श्रद्धा सिंग 4/35).