दिल्लीत वृद्धांसाठी पुन्हा पेन्शन योजना

दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पार्टीच्या सरकारने वृद्धांसाठीची पेन्शन योजना पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली आहे. या योजनेत आणखी 80 हजार वृद्धांचा समावेश करण्यात आला आहे. 60 ते 69 वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 2 हजार रुपये देण्यात येतील, तर 70 हून अधिक वयोगटातील वृद्धांना महिन्याला अडीच हजार रुपये मिळणार आहेत.

डबल इंजिन सरकारच्या राज्यात खूप कमी पेन्शन – केजरीवाल

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. ज्येष्ठ नागरिकांना देशात सर्वाधिक पेन्शन दिल्लीत दिली जात आहे. इतर राज्यांमध्ये जिथे डबल इंजिन सरकार आहे तिथे खूप कमी पेन्शन मिळत आहे. मध्य प्रदेश, महाराष्ट्रात महिन्याला 500 रुपये आणि आसाममध्ये 600 रुपये पेन्शन मिळत असल्याचे केजरीवाल म्हणाले.