राष्ट्रवादीच्या ‘घडय़ाळा’ची सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव व ‘घडय़ाळ’ चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी सुनावणी होणार आहे. पक्ष व ‘घडय़ाळ’ चिन्ह अजित पवार गटाला देण्याच्या पेंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आव्हान दिले आहे. याबाबत महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर पहिल्यांदाच सुनावणी होत असल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडखोरी करून अजित पवार यांनी सत्तेत स्थान मिळवले होते. त्यानंतर त्यांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव व चिन्ह देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला होता. त्या निर्णयाला आव्हान देत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने फेब्रुवारी महिन्यात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्या याचिकेवर मंगळवारी न्यायमूर्ती सूर्य कांत व न्यायमूर्ती उज्वल भुयान यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होणार आहे. न्यायालयाच्या बोर्डावर सीरियल क्रमांक 30 वर हे प्रकरण सूचिबद्ध केले आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीपूर्वी या प्रकरणात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने अंतरिम अर्ज दाखल केले होते आणि अंतिम निर्णय होईपर्यंत ‘घडय़ाळ’ चिन्ह गोठवण्याची विनंती केली होती. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी न्यायालय कोणते निर्देश देतेय याकडे राजकीय वर्तुळासह सर्वांचेच लक्ष लागले आहे.

अजित पवार गटाला धाकधूक

ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत अजित पवार गटाला न्यायालयाने चांगलेच फटकारले होते. ‘घडय़ाळ’ चिन्हाखाली ‘सर्वोच्च न्यायालयाच्या अधीन राहून’ असा उल्लेख करण्याचे अंतरिम आदेश न्यायालयाने दिले होते. त्या आदेशाचे अजित पवार गटाने उल्लंघन केल्याचा दावा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने केला होता. मंगळवारीही हा मुद्दा उपस्थित होण्याची शक्यता असल्याने अजित पवार गटाची धाकधूक वाढली आहे.