तेलंगणा सरकारने नाकारले अदानींचे 100 कोटी

अदानी लाच प्रकरणामुळे आंध्र प्रदेशची प्रचंड बदनामी झाली असून या प्रकरणी आम्ही लवकरच कारवाई करू, असा इशारा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी दिल्यानंतर आता तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी अदानी समूहाची देणगी स्वीकारण्यास नकार दिला आहे. अदानी समूहाने यंग इंडिया स्किल युनिव्हर्सिटीसाठी 100 कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती. अदानी लाच प्रकरणामुळे राज्य सरकार आणि माझ्या स्वतःच्या प्रतिमेला हानी पोहोचू शकते. त्यामुळे अदानी समूहाकडून देणगी स्वीकारणार नसल्याचे रेड्डी यांनी स्पष्ट केले.

या प्रकरणी आज पत्रकार परिषद घेऊन रेड्डी यांनी राज्य सरकारची भूमिका मांडली.

 सरकारने रविवारीच अदानी समूहाला एक पत्र पाठवले आहे. त्यात अदानी समूहाला विद्यापीठाकडे 100 कोटी रुपये हस्तांतरित करू नये, असे सांगण्यात आले आहे.

 अनेक पंपन्यांनी विद्यापीठाला निधी दिला आहे. परंतु तेलंगणा सरकारने आतापर्यंत कुठल्याही समूहाकडून आपल्या खात्यात 1 रुपयाही घेतलेला नाही, असेही रेड्डी यांनी स्पष्ट केले.