पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लाडके उद्योगमित्र गौतम अदानी यांच्यावर 2200 कोटींची लाच दिल्याचा ठपका अमेरिकेतील फेडरल कोर्टाने ठेवला आहे. त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंटही जारी करण्यात आला आहे. यावर चर्चेची मागणी करत विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संसदेच्या दोन्ही सभागृहांत प्रचंड गदारोळ झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी सभागृहात येताच ‘एक है तो सेफ है’ घोषणा देत विरोधकांनी सभाग़ृह दणाणून सोडले. मोदी अदानींना वाचवत आहेत, असा आरोप विरोधकांनी करताच यातला एकही शब्द कामकाजात राहणार नाही, असे नमूद करत सभापतींनी चर्चेची मागणी धुडकावली व सभागृहाचे कामकाज बुधवारपर्यंत स्थगित केले. दरम्यान जंतर मंतरवर युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ‘मोदी-अदानी भाई-भाई… देश बेचकर खाई मलाई’ अशा घोषणा देत संतप्त निदर्शने केली.
संसद बुधवारपर्यंत तहकूब
अदानी प्रकरणाचे तीव्र पडसाद संसदेच्या दोन्ही सभागृहांत उमटले. या प्रकरणी सरकारने तातडीने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी विरोधी खासदारांनी लोकसभेत केली. सभागृहाचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्षाच्या खासदारांनी केलेल्या जोरदार घोषणाबाजीमुळे कामकाज सुरुवातीला दुपारी बारा, त्यानंतर दुपारी दोन व नंतर दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.