विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत महायुतीला पूर्ण बहुमत मिळाल्यानंतर राज्यात सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागणार आहे, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असणार आहेत.
भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला मंजूरी दिली आहे. अजित पवार गटानेही त्याला संमती दिली आहे. दरम्यान फडणवीस हे दिल्लीत दाखल झाले असून ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत चर्चा करतील. त्यानंतर महायुतीतील तिन्ही पक्षाच्या नेत्यांची बैठक होऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाच्या नावाची औपचारीक घोषणा होईल.
शिंदे आज मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार
महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ 26 नोव्हेंबर रोजी कायदेशीरदृष्टय़ा संपुष्टात येत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्याच राज्यपालांकडे राजीनामा सोपवणार आहेत. नव्या सरकारची स्थापना होईपर्यंत हंगामी मुख्यमंत्री म्हणून काम पाहतील.
शिंदे नाराज असल्याच्या चर्चा
मुख्यमंत्री पद भाजपकडेच राहणार असल्याचा निरोप दिल्लीतून एकनाथ शिंदे यांना कळविण्यात आला आहे. यानंतर शिंदे नाराज असल्याची व त्यांनी सर्व बैठका रद्द केल्याची चर्चा आहे. दिल्लीतून भाजप पक्षश्रेष्ठाRनी डोळे वठारताच एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत केलेली एक्स पोस्ट डिलीट केली आहे. दुसरीकडे ‘लाडक्या बहिणीचा भाऊ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच’ असा संदेश पाठवत शिंदे गटाने उद्या सकाळी 9 वाजता कार्यकर्ते आणि पदाधिकाऱयांना वर्षावर बोलावले आहे.
असा असेल मंत्रिमंडळ फॉर्म्युला
महायुतीमध्ये 1 मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांचा फॉर्म्युला ठरला आहे. महाराष्ट्रातील मंत्रिमंडळाची कमाल मर्यादा 43 आहे. हे लक्षात घेता प्रत्येक 6-7 आमदारांमागे एक मंत्रीपद असे सत्तेचे वाटप तिन्ही पक्षांत केले जाईल. यामध्ये भाजप 21-22, शिंदे गट 10-12 आणि अजित पवार गटाच्या वाटय़ाला 8-10 मंत्रीपदे येण्याची शक्यता आहे.
गृह, अर्थ, नगर विकास आणि महसूल ही प्रमुख चार खाती भाजप आपल्याकडे ठेवण्यास उत्सुक आहे. भाजप गृह आणि अर्थ खात्यासाठी आग्रह धरू शकते.
नगरविकास, सार्वजनिक बांधकाम, गृहनिर्माणसाठी शिंदे गट आग्रही, तर अर्थ, सहकार, जलसंपदा आदी महत्त्वाच्या खात्यांसाठी अजितदादा गटाचे प्रयत्न.
मुख्यमंत्रीपदासाठी कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही. आम्ही तिघे बसून निर्णय घेऊ असे सांगत अजित पवार यांनी मात्र सस्पेन्स वाढवला.
नव्या सरकारचा शपथविधी लांबणीवर?
मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांच्या नावाची चर्चा असली तरी महायुतीचा विधिमंडळ नेता ठरविण्यासाठी भाजप, शिंदे आणि अजित पवार गटाच्या विधिमंडळ सदस्यांची संयुक्त बैठक अद्याप पार पडलेली नाही. त्यामुळे नव्या सरकारचा शपथविधी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
भाजप आमदारांत चलबिचल
निवडणूक निकालानंतर शिंदे गट आणि अजित पवार गटाची विधिमंडळ पक्षाची बैठक होऊन विधिमंडळ नेत्याची निवडही झाली आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीत भाजपने सर्वाधिक 132 जागा जिंकल्या आहेत. यानंतरही भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक अद्याप झालेली नाही आणि विधिमंडळ नेताही निवडला नाही त्यामुळे भाजप आमदारांत चलबिचल सुरू झाली आहे.