आचारसंहितेत फडणवीसांची भेट घेणाऱ्या रश्मी शुक्लांवर कारवाई करा, काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे मागणी

राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना वादग्रस्त आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आचारसंहितेचा भंग केलेला आहे. निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घेऊन रश्मी शुक्ला यांच्यावर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवत्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.

तेलंगणामध्ये अशाच प्रकारे पोलीस महासंचालक व एका वरिष्ठ अधिकाऱयाने वरिष्ठ मंत्र्यांची भेट घेतली असता निवडणूक आयोगाने त्यांच्यावर तत्काळ कारवाई केली होती. भाजपची सत्ता नसलेल्या राज्यात निवडणूक आयोग तत्काळ कारवाई करतो, पण भाजपाशासित राज्यात निवडणूक आयोगाला काही दिसतच नाही का, असा सवाल काँग्रेसने केला आहे. रश्मी शुक्ला यांच्यावर विरोधी पक्षांच्या नेत्यांचे फोन टॅपिंग करण्यासारखे गंभीर गुन्हे आहेत. रश्मी शुक्ला यांना पोलीस महासंचालक पदावरून हटवावे अशी मागणी काँग्रेस पक्षाने निवडणूक काळात केली होती. त्यानंतर त्यांना पदावरून हटवण्यात आले होते.