ऑफिसमध्ये काम करत असताना एका कर्मचाऱयाला झोप लागली. यामुळे कंपनीने त्याला कामावरून काढून टाकले. मात्र कर्मचाऱयाने कंपनीविरुद्ध कायदेशीर लढा दिला आणि कोर्टाने त्याला 40.71 लाखांची नुकसानभरपाई दिली.
झांग नावाचा हा कर्मचारी गेल्या 20 वर्षांपासून या केमिकल कंपनीत काम करत होता. 2004 मध्ये तो कंपनीत रुजू झाला होता. अनेक विभागांचा प्रमुख म्हणून त्याने काम केले. त्याच्यावर कामाचा ताण होता. काही महिन्यांपूर्वी तो उशिरापर्यंत काम करून ऑफिस डेस्कवर डोके ठेवून झोपला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱयात कैद झाली. झांग साधारण तासभर झोपला. कामाच्या वेळी झोपणे हा कंपनीच्या रोजगार कराराचे उल्लंघन आहे. कंपनीचा वेळ वाया घालवला आहे. यामुळे उत्पादकता कमी झाली आहे. असे वर्तन कंपनी सहन करणार नाही म्हणून तुम्हाला कामावरून काढण्यात येत आहे, असा ई-मेल कंपनीने झांगला पाठवला.
झांगने कंपनीविरोधात कोर्टात धाव घेतली. झांगची दोन दशकांची उत्कृष्ट कामगिरी, पदोन्नती आणि वेतनवाढ लक्षात घेता त्यांना कामावरून काढून टाकणे योग्य नाही असा कोर्टाने निर्णय देत झांगला 40.71 लाखांची भरपाई दिली.