EVM मशीनद्वारे घेण्यात येणाऱ्या मतदान प्रक्रियेबाबत मतदान करणाऱ्या मतदारांच्या मनात साशंकता असून ही सदोष मतदान प्रक्रिया बंद करून बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात यावे अशा प्रकारचे लेखी निवेदन दापोली उप विभागीय अधिकारी ( प्रांत) डॉ. अजित थोरबोले यांना देण्यात आले.
निकाल हा निकाल असतो मात्र विधानसभा निवडणुकीतील दापोली मतदार संघातील निकाल हा अनपेक्षित असून लोकशाहीचा गळा घोटून खूण करणारा निकाल आहे. हा निकाल मतदारांनी दिलेल्या मतदानातून लागलेला निकाल नसून तो ई. व्ही.एम. मशीन हेराफेरी करुन दिलेला निकाल असल्याने या निकाला विरोधात मतदारांसह नागरिकांनी उत्स्फूर्तपणे एकत्रित येऊन काळ्या फिती लावून मुक मोर्चा काढला. मतदार तहसीलदार कार्यालयात पोहोचले आणि तेथे त्यांनी दापोलीचे उप विभागीय अधिकारी डॉ. अजित थोरबोले यांना ई. व्ही.एम.मशीनव्दारे घेण्यात आलेली मतदान प्रक्रियाच सदोष असून निवडणूक आयोगाने हिम्मत दाखवून बॅलेट पेपरवर परत निवडणूक घेऊन दाखवली तर निश्चितच त्याचा निकाल हा वेगळा लागेल असा ठाम विश्वास व्यक्त केला.
263 दापोली विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवाराला मिळालेली मते ही संशयास्पद आहेत. याला पुष्टी म्हणजेच प्रत्यक्ष मतमोजणी प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अनेक मतदान केंद्रातील ई. व्ही. एम. मशीन या 99 टक्के चार्जिंग असल्याचे दाखवत होत्या. या बाबत मतमोजणी प्रतिनिधींनी आपला आक्षेप नोंदवला असता सबंधित अधिका-यांनी उडवा उडवीची उत्तर देऊन वेळ मारुन नेली. EVM मशीन मध्ये हेराफेरी करून निवडणुकीचे निकाल चुकिच्या पध्दतीने लावण्यात आला आहे. असे मतदार आणि नागरिकांचे मत असून विधानसभा निवडणुकीचा अशा प्रकारे लावलेला निकाल ही लोकशाहीसाठी धोक्याची घंटा आहे. त्यामुळे भविष्यात नागरिकांचा लोकशाहीवरचा विश्वास उडेल. मग हा देश हुकुमशाहीकडे वाटचाल करेल. अनेकांनी हौतात्म्य पत्करुन आपल्या कुटूंबावर तुळशीपत्र ठेवून देशाला पारतंत्र्यातून मुक्त केले. ती स्वतंत्रता घालवून सत्ताधा -यांच्या हितासाठी जोर जबरदस्तीने येथील लोकशाही धोक्यात येवू नये यासाठी EVM मशीन बंद करून त्या ऐवजी आगामी काळात होणारी प्रत्येक निवडणुक ही बॅलेट पेपरवरच घेण्यात याव्यात अशा प्रकारची मागणी प्रांतांना देण्यात आलेल्या पत्रात केली आहे.
यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हा प्रमुख संजय कदम , काँग्रेसचे मकबुल दिनवारे, नगराध्यक्षा ममता मोरे, उप नगराध्यक्ष खालिद रखांगे, दापोली तालूका प्रमुख ऋषिकेश गुजर, तालुका सचिव नरेंद्र करमरकर, शिवसेना महिला आघाडी उप संघटिका मानसी विचारे , विश्वास कदम, माजी सभापती चंद्रकांत बैकर, शिवसेना शहर प्रमुख संदिप चव्हाण, सुंदर राणे, अनिल जाधव, अनंत जयराम ऊर्फ भाऊ मोहीते, तृशांत भाटकर, अक्षय जालगावकर, अनंत महाडिक ,दापोली नगर पंचायतीचे शिवसेनेचे सर्व नगरसेवक आदींसह मतदार नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपले निवेदन शासनाकडे पाठवण्यात येईल असे उपविभाग अधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी सांगितले.