संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यसभेत सभापती जगदीप धनखर आणि विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. यानंतर राज्यसभेचे कामकाज 27 नोव्हेंबरपर्यंत तहकूब करण्यात आले. या अधिवेशनात एकूण 16 विधेयके मांडण्यात येणार असून, 11 विधेयकांवर चर्चा, 5 मंजुरीसाठी मांडण्यात येणार आहेत.
राज्यसभेत सकाळी 11 वाजता कामकाज सुरू झाल्यानंतर सभापती जगदीप धनखड यांनी बोलणे थांबवताच विरोधी पक्षनेत्यांनी एलओपीला बोलू द्या, अशी घोषणाबाजी सुरू केली. यावर धनखड म्हणाले की, मी बोलून एक सेकंदही उलटला नाही आणि तुम्ही लोक ओरडू लागले. त्यामुळे विरोधी पक्षनेत्याच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचतो. या वर्षी आपल्या राज्यघटनेला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. आपण थोडी मर्यादा राखली पाहिजे. त्यावर खरगे उभे राहिले आणि म्हणाले की, त्या 75 वर्षांपैकी माझेही योगदान 54 वर्षांचे आहे, त्यामुळे मला शिकवू नका. यावर धनखर म्हणाले, मी तुमचा खूप आदर करतो आणि तुम्ही हे बोलत आहात. मी दुखावलो आहे.
हिवाळी अधिवेशनात अदानी, मणिपूर हिंसाचार आणि रेल्वे अपघातांवरून गदारोळ होण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या न्यूयॉर्क फेडरल कोर्टाने गौतम अदानी यांच्यावर सौरऊर्जेचे कंत्राट मिळवण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांना सुमारे 2,200 कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप केला आहे. राहुल गांधी यांनी याप्रकरणी जेपीसीची मागणी केली आहे.