फळे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. फळांमध्ये आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळतात. मात्र अनेक लोकांना फळे खायला आवडत नाहीत. त्यामुळे ते सर्व फळांचा रस पितात. पण फळे खाण्यापेक्षा ज्यूस पिणे हेल्दी आहे का? याबाबत आज आपण माहिती घेणार आहोत.
आरोग्य तज्ज्ञ्यांच्या मते फळांचा रस पिण्यापेक्षा फळे खाणे कधीही चांगले. जेव्हा तुम्ही कोणत्याही फळाचा रस बनवता तेव्हा या संपूर्ण प्रक्रियेत फळांमधील संपूर्ण फायबर बाहेर काढले जाते. त्यानंतर रसात फक्त पाणी आणि साखर राहते. मात्र हे फायबरच आपल्या शरिरासाठी फायदेशीर असतात. आपली पचनसंस्था निरोगी ठेवण्यासाठी फळांमध्ये असलेले फायबर खूप महत्त्वाचे असते. याशिवाय फळांमध्ये अनेक प्रकारची जीवनसत्त्वे, खनिजे, अँटिऑक्सिडंट्स आणि फायटोकेमिकल्स असतात.
सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट डॉ शिल्पा अरोरा यांनी फळांच्या सेवनाबाबत माहिती दिली आहे. त्यांच्या मते फळांचे ज्यूसच्या रूपात सेवन करू नये. या फळांचा रस प्यायल्याने तुमच्या रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढू शकते. ज्यामुळे मधुमेहाचा धोका वाढतो. जर तुम्ही फळे खाल्लीत तर तुमच्या शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. जे तुम्हाला वजन कमी करण्यास मदत करते, असे त्या म्हणाल्या.
या फळांचा रस पिणे प्रामुख्याने टाळा
– संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि फायबर मुबलक प्रमाणात आढळते. त्याचा रस प्यायल्याने त्यातील सर्व फायबर बाहेर पडतात आणि तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढू लागते.
– अननसात भरपूर जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट असतात. यामध्ये व्हिटॅमिन बी6, मॅग्नेशियम, कॉपर, फायबर असतात. तुम्ही ते पूर्ण खावे. त्याचा रस प्यायल्याने मधुमेहाचा धोका वाढतो.
– रोज एक सफरचंद खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. त्यात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी6, फायबर, अँटीऑक्सिडंट्स, पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॉपर, मँगनीज आढळतात. त्यामुळे त्याचा रस काढून पिण्याची चूक करू नका.
तुम्हाला जर रस प्यायला आवडत असेल तर तुम्ही आले, कढीपत्ता आणि दूधीचा रस पिऊ शकता. त्यांचा रस प्यायल्याने तुमच्या रक्तातील साखरेची पातळी कमी होते. याशिवाय शरीराला इतरही अनेक फायदे मिळतात. त्यामुळे फळांचा रस पिणे टाळा.