निवडणूक आयोगाचं सध्याचं वागणं लोकशाहीसाठी बरं नाही, हीच जनभावना आहे; रोहित पवार यांनी EVM बाबत उपस्थित केले सवाल

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या. तसेच निकालही जाहारी झाले आहेत. हे निकाल अविश्वसनीय आणि अनपेक्षित असल्याचे विरोधी पक्षांनी म्हटले आहे. राज्यातील निवडणूक निकालांमुळे EVM मशीन आणि निवडणूक आयोगाच्या निःपक्षपातीपणाबाबत प्रश्न उपस्थित होत आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी जनभावना व्यक्त करत EVM वर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

रोहित पवार यांनी एक्सवर याबाबत पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, गुजराती EVM च्या विळख्यात अडकली महाराष्ट्राची लोकशाही? आज कराड येथे आलो असता सामान्य नागरिकांनी विधानसभा निकालाबाबत शंका उपस्थित केली. एका बातमीचे कात्रण दाखवत निवडणूक आयोग खरंच निष्पक्ष काम करत होता का? असा प्रश्न सामान्य नागरिकांनी उपस्थित केला. निकाल प्रसिद्ध झाल्यावर लगेच फॉर्म 20 जाहीर करायला हवा होता, मात्र निवडणूक आयोग कोणाच्या आदेशाची वाट पाहत आहे की मतांची बेरीज बरोबर येत नाही?आयोगाचं सध्याचं वागणं लोकशाहीसाठी बरं नाही, हीच जनभावना आहे. या पोस्टसह त्यांनी एक कात्रणही जोडले आहे.

या सर्व घटनांमुळे निवडणूक आयोग आणि EVM बाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. विरोधी पक्षांनीही ईव्हीएमबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत बॅलेटपेपरवर मतदान घेण्याची मागणी केली आहे. आता रोहित पवार यांनी जनभावना आणि सामान्य नागरिकांनी दिलेले पुरावे याबाबतची पोस्ट केली आहे. त्यामुळे ईव्हीएमबाबत सामान्य जनतेच्या मनातही शंका असल्याचे दिसून येत आहे.