इम्रान खान यांच्या घोषणेनंतर पाकिस्तानात निदर्शने; तीन मागण्यांसाठी समर्थक आक्रमक

इम्रान खान आणि पीटीआय कार्यकर्त्यांची लवकरात लवकर सुटका, 2024 मध्ये झालेल्या निवडणुकीचे निकाल स्वीकारणे आणि पाकिस्तानी संसदेत मंजूर झालेला न्यायालयांचा अधिकार कमी करणारा 26 वी घटनादुरुस्ती कायदा मागे घेणे या मागण्यांसाठी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी 24 नोव्हेंबर रोजी देशभरात निदर्शने करण्यास सांगितले होते. त्यानुसार इम्रान खान यांच्या समर्थकांनी आज दिवसभर ठिकठिकाणी निदर्शने करत राजधानी इस्लामाबादकडे कूच केली. इम्रान खान यांनी ही शेवटची संधी असल्याचेही म्हटले आहे. इम्रान खान यांचा पक्ष ‘पीटीआय’ अर्थात पाकिस्तान तेहरीक ए इन्साफ आणि समर्थकांनी पाकिस्तानात ठिकठिकाणी निदर्शने सुरू केली आहेत. इम्रान खान यांच्या आवाहनानंतर पाकिस्तानमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला. इस्लामाबादमधील अनेक भागांत मोबाईल आणि इंटरनेट सुविधा बंद करण्यात आल्या. तसेच आंदोलनात सहभागी होणाऱयांना अटक करून कठोर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. खान यांचे समर्थक इस्लामाबादच्या दिशेने निघाल्यामुळे त्या दिशेने जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत.

आंदोलन करा किंवा पक्ष सोडा, आंदोलनात सहभागी व्हा किंवा पक्ष सोडा अशी अट इम्रान खान यांनी समर्थकांना घातली आहे. तुम्हाला मार्शल लॉमध्ये जगायचे आहे की स्वातंत्र्य हे ठरवायचे आहे, असे इम्रान खान यांनी म्हटले आहे.

 राजधानी इस्लामाबाद, रावळपिंडी आणि पंजाब प्रांतात सार्वजनिक सभांना बंदी घालण्यात आली आहे. इस्लामाबादकडे जाणारे मुख्य रस्ते 1200 कंटेनरने रोखण्यात आले आहेत.

 इस्लामाबाद पोलिसांच्या 6 हजार 325 कर्मचाऱयांसह इतर सैन्याचे 21 हजार 500 कर्मचारी आंदोलन थांबवण्यासाठी तैनात करण्यात आले आहेत. रावळपिंडीत सहा हजार दंगलविरोधी पोलीस कर्मचारीही तैनात करण्यात आले आहेत.